हनुमान टेकडीवरील प्रकार : रोपट्यांच्या बचावांकरिता धावपळ लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील हनुमान टेकडीवर वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने वर्धेकरांकरिता वृक्षारोपणाकरिता जागा उपलब्ध करून दिली. या जागेवर अनेकांनी महाश्रमदान करीत खड्डे करून रोपट्यांचे रोपण केले. वृक्षारोपणानंतर पाऊस येईल आणि आपण लावलेली रोपटी मोठी होतील या आशेत असताना गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली. यामुळे रविवारी येथे नित्याप्रमाणे आयोजित महाश्रमदानात नागरिकांकडून या रोपट्यांना पाणी देत त्यांचे संगोपन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले. खडकाळ आणि ओसाड असलेल्या या हनुमान टेकडीवर विविध सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण झालेला हा भाग खडकाळ असल्याने येथे लावण्यात आलेल्या रोपट्यांना वेळीच पाणी मिळणे अपेक्षित आहे. मात्र पावसाने मारलेल्या दडीमुळे लावलेली रोपटे धोक्यात येण्याची शक्यता असल्याने अनेकांनी आज या रोपट्यांना पाणी देण्याकरिता कंबर कसल्याचे दिसून आले. यात शाळकरी विद्यार्थ्यांसह छाया बालकाश्रमातील निराधारांनीही पाणी देत या रोपट्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. येथे उपस्थित युवकांनी व चिमुकल्यांनी जलशुद्धीकरण केंद्रापासून एक पाईप टाकूण टेकडीवर पाणी नेत बादलीने या रोपट्यांना पाणी दिले. यामुळे वर्धेत वृक्षारोपणासह त्याच्या संगोपनाकरिताही नागरिकांत आता जनजागृती झाल्याचे दिसून आले. यावेळी वर्धेतील एका खासगी संगणक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थीही उपस्थित होते. त्यांना वैद्यकीय जनजागृती मंच आणि आम्ही वर्धेकर सदस्यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभल्याचे दिसून आले.
वृक्षसंवर्धनाकरिता सरसावले अनेक हात
By admin | Published: July 10, 2017 12:50 AM