नरहरशेट्टीवार प्रकरण : भागीदार, सहकाऱ्यांमध्ये कारवाईची धास्ती वर्धा : गजानननगरीच्या माध्यमातून बँकांसह गोरगरीब नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सतीश नरहरशेट्टीवार याला अटक करण्यात आली. यानंतर ले-आऊट आणि फसवणूक प्रकरणाशी निगडीत व्यक्तींची चौकशी सुरू झाली आहे. सेवानिवृत्त कर्मचारी, तत्कालीन तलाठ्याच्या अटकेनंतर इतरांचीही चौकशी होऊ शकते, ही बाब सर्वश्रूत आहे. या बाबीचा धसका घेत अनेकांची अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र आहे. आपली तर चौकशी होणार नाही ना, अशी भीती नरहरशेट्टीवारशी जुळलेल्या अनेकांना असल्याचे बोलले जात आहे. रियल इस्टेटचा बिझनेस अनेक लोक एकत्र येऊन करीत असतात. सर्वांचा पैसा उभा करून या व्यवसायात उतरले जाते. शेतजमिनी खरेदी करायच्या आणि त्यावर ले-आऊट विकसित करून ते प्लॉट विकायचे, असा हा व्यवसाय आहे. वर्धा जिल्ह्यात मात्र हा काळा व्यवसाय ठरत आहे. नरहरशेट्टीवार यांनी गजानन नगरी या नावाने अनेक ले-आऊट विकसित केलेत. या व्यवसायात पत्नी कविता नरहरशेट्टीवारसह त्यांचे नातलगही गुंतलेले असून अनेक ले-आऊट धारकांशी त्यांची ‘पार्टनरशीप’ असल्याचेही बोलले जात आहे. काहींनी त्यांच्याकडून प्लॉट घेतले तर काहींनी आर्थिक व्यवहार केलेत. काहींनी प्रशासकीय कामांमध्ये त्यांना सहकार्य केले. सावंगी (मेघे) पोलिसांनी नरहरशेट्टीवार यांना अटक केल्यानंतर सर्वांगाने चौकशी केली जात आहे. यामुळे गजानन नगरीशी संबंधित सर्वांचेच धाबे दणाणले आहे. नरहरशेट्टीवार यांच्याशी संबंधित सर्वांचीच चौकशी होणार, अशा चर्चाही रंगत आहेत. या चर्चांमुळे संबंधितांमध्ये धास्ती निर्माण झाल्याचे चित्र आहे. नरहरशेट्टीवार प्रकरणामध्ये पूर्णत: गुंगलेल्या एका तलाठ्याने अटकपूर्व जामीन प्राप्त करण्यात यश मिळविले. असे असले तरी या जामिनाची मुदत संपल्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यामुळे आता सर्वांची चौकशी होणार, या धास्तीने त्यांच्याशी संबंधित व्यक्तीही अटकपूर्व जामिनासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. काही वकिलांचा सल्ला घेण्यात व्यस्त तर काही सहलीची तयारी करीत असल्याचेही सांगितले जात आहे. एकूणच नरहरशेट्टीवार याला अटक झाल्यानंतर फसवणूक करून मोठे होणाऱ्या ले-आऊट धारकांची भंबेरी उडाली आहे. अवैध ले-आऊट व फसवणूक प्रकरणात पोलिसांना आणखी किती मासे गळाला लागतात, हे पोलिसांचा तपासच सांगेल. तुर्तास, कोण अटकपूर्व जामीन घेतात, हेच पहावे लागणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
अटकपूर्व जामिनासाठी अनेकांकडून हालचालींना वेग
By admin | Published: December 22, 2016 12:25 AM