राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी, वर्धा : भाषांचा दिवसेंदिवस ऱ्हास होताना दिसत असून, आपण मराठीला ज्ञानभाषा करू शकलो नाहीत. आपण आतापर्यंत इंग्रजीवरच भर देत आल्याने ही अडचण निर्माण झाली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नव्या शिक्षण नीतीमधून सर्वच शिक्षण आता मराठीतूनही घेता येणार आहे. त्यामुळे मराठी ही ज्ञानभाषा असून, व्यवहार भाषेतही त्याचा उपयोग होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत अखेरच्या दिवशीच्या शुभारंभ सत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर भारतीय संस्कृती संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, खासदार रामदास तडस, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. समीर मेघे, माजी आ. सागर मेघे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष व संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष उषा तांबे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, विलास मानेकर, गजानन नारे आदी उपस्थित होते.
पुढे उपमुख्यमंत्री म्हणाले, स्वातंत्र्याचा लढा असो, भूदान चळवळ असो, शेवटच्या माणसाला न्याय देण्याचे काम या भूमीतूनच झाले आहे. संपूर्ण स्वराज्याची मागणी येथे झाली होती. रामराज्य, सुराज्याच्या शाश्वत विचारांचा संदेश याच भूमीतून दिला गेला. त्यामुळे साहित्य संमेलन येथे होणे अतिशय औचित्यपूर्ण आहे. थोडक्यात स्वातंत्र्याची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करणारी ही भूमी आहे. वर्धा साहित्य संमेलनात प्रत्येक मंच वैदर्भीय साहित्यिकांना समर्पित आहे. याची नोंद उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात घेतली. प्राचार्य राम शेवाळकर यांच्या नावाने मुख्य व्यासपीठ आहे.
ते म्हणाले प्रा. राम शेवाळकर यांचे व्याख्यान ऐकणे, ही ज्ञानवर्धक बाब होती. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, महेश एलकुंचवार, आशाताई बगे, आशाताई सावदेकर यांच्यासारख्या साहित्यिकांनी विचाराची प्रेरणा दिली आहे. कवीवर्य सुरेश भट यांनी मराठीला गझल देऊन भाषेला उंचीवर पोहोचवले, कविवर्य ग्रेस यांनी तर तरुणाईला वेड लावले होते. त्यामुळे विदर्भाच्या भूमीत साहित्य संमेलनाचे आयोजन आनंददायी आहे. साहित्य संमेलनासोबतच नव माध्यमांची मुबलक उपलब्धता अभिव्यक्तीचे नवे दालन म्हणून पुढे येत आहे. मात्र, नव माध्यमांमुळे नव साहित्यिक वेगळी अभिव्यक्ती प्रदर्शित करीत असले तरी मात्र उंची आणि खोलीचे साहित्य पुस्तकातून अभिव्यक्त होते. त्यामुळे आजही पुस्तकांचे संदर्भ महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच विदर्भ साहित्य संघाने मराठी साहित्य आणि साहित्यिकांचे संवर्धन करण्याचे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून केले आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शासनाकडून १० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित ९६व्या साहित्य संमेलनाची स्मरणिका ‘वरदा’चे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक प्रदीप दाते, संचालन रेणुका देशकर यांनी केले.
आम्ही राजकारणी साहित्यिकांची प्रेरणा!
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचे काय काम? असे प्रश्न विचारले जात आहेत. एका अर्थाने ते बरोबरही आहे, परंतु आम्ही राजकारणी या साहित्यिकांची प्रेरणा आहे. आम्ही नसलो तर व्यंगचित्रकारांना काम मिळणार नाही. आमच्या राजकारण्यातही काही साहित्यिक आहे. सकाळी सकाळी टीव्ही सुरू केली की, साहित्य कसं ओसंडून वाहते. म्हणून साहित्याचा व्यासपीठावर आम्हालाही थोडीशी जागा मिळते. ही थोडीशी जागा मिळाली की ती जास्तीत जास्त व्यापून टाकण्यामध्ये राजकारण्यांचा हातखंडा असतो, असा राजकीय टोला लगावताच सभामंडपातील रसिकश्रोते खळखळून हसले.
समारोपात आरोप म्हणून शुभारंभालाच आलो!
समारोपाचा कार्यक्रम म्हटला की आरोप-प्रत्यारोप असतो. म्हणून समारोपीय कार्यक्रमाऐवजी मी शुभारंभालाच आलोय, कारण शुभारंभात प्रारंभ आहे, असे कबूल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात केली. उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्र्यांच्या भाषणात घोषणाबाजी करून गोंधळ घालण्यात आला. समारोपीय सत्रात केंद्रीय नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस निमंत्रित होते. परंतु उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ऐन वेळेवर समारोपीय कार्यक्रम टाळून पहिल्याच सत्राच्या शुभारंभाला हजेरी लावली. त्यामुळे या सर्व घडामोडींवर साहित्यनगरीत चर्चा व्हायला लागली आहे.
खुर्च्याखाली उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम बदलला
संमेलनास्थळावरील आयोजनानुसार आणि प्रशासनाकडून आलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानुसार सकाळी १० वाजता संमेलनस्थळी आचार्य विनोबा भावे सभामंडपात उपस्थित राहणार होते. परंतु सभामंडपातील प्रेक्षकांच्या खुर्च्या खाली असल्याने उपमुख्यमंत्र्यांचा ताफा थेट सावंगीच्या कार्यक्रमाकडे वळविला. त्यानंतर संमेलनस्थळी भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि रसिकश्रोते सभामंडपात दाखल झाल्यानंतर ११:०५ वाजता येथील कार्यक्रमाला सुरुवात झाली.