वर्धा : अधिकारी, कर्मचारी खासगी असो वा शासकीय त्यांना वर्षभर काम केल्यानंतर हिशेब द्यावाच लागतो़ वर्षभर केलेल्या कामांचा गोषवारा व लेखे सादर करावे लागतात़ या काळात शासकीय सुट्याही व्यर्थच ठरतात़ सध्या मार्च एंडिंगमुळे रामनवमीची सार्वत्रिक सुटी व चवथा शनिवार असताना कर्मचारी कार्यरत दिसून आले़ शहरातील जवळपास सर्वच कार्यालयांत कर्मचारी काम करताना दिसून येत होते़ केंद्र व राज्य शासनाद्वारे विविध योजना राबविल्या जातात़ या योजना वर्षभर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर असते़ अधिकारी देखरेख ठेवत योजना राबवितात़ या योजनांवर शासनाकडून मोठा निधी खर्च केला जातो़ यातील किती निधी खर्च झाला, किती शिल्लक आहे, कोणत्या कामांवर किती खर्च झाला हे पाहण्यासाठी शासकीय कार्यालयांत मार्च महिनाच उगवतो़ प्रत्येक महिन्यात अहवाल सादर होत असला तरी मार्च महिन्यामध्ये वर्षभराचा हिशेब द्यावा लागतो़ याच महिन्यात राहिलेल्या कामांची लगबग सुरू होते़ एका वर्षात न झालेली कामे या ३० दिवसांत कशी पूर्ण होतील, यासाठी लगबग सुरू असल्याचे दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)शासनाकडून जिल्ह्याला मिळणारा शासकीय निधी कोषागार अधिकारी कार्यालयातूनच प्राप्त होतो़ शिवाय अन्य निमशासकीय, खासगी रोख्यांची जबाबदारीही कोषागार कार्यालयाला सांभाळावी लागते़ यामुळे याच कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात अधिक धावपळ करावी लागत असल्याचे दिसते़ शनिवारी सुटीच्या दिवशी उर्वरित कार्यालयात कमी कर्मचारी होते; पण कोषागार कार्यालयात सर्वाधिक कर्मचारी आणि तेही कार्यात व्यस्त दिसत होते़ जि़प़ वित्तविभाग, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य कार्यालयेही दिवसभर सुरू होती़
‘मार्च एंडिंग’; सुटीतही कर्मचारी ‘आॅन ड्युटी’
By admin | Published: March 29, 2015 2:05 AM