नागरिकांत समाधान : खासदार व कमान्डन्ट ब्रिगेडीयर यांच्यात चर्चापुलगाव : स्थानिक स्मशानभूमी सौंदर्यीकरणाची कामे नगर परिषद व दारूगोळा भांडार यांच्यातील वादामुळे रखडले आहे. याबाबत खासदार व कमान्डन्ट ब्रिगेडियर यांच्यात बैठक झाली. यात विविध समस्यांवर चर्चा झाल्याने स्मशानभूमी सौंदर्यीकरणाचे काम मार्गी लागेल, अशी अपेक्षा खासदार तडस यांनी व्यक्त केली.केंद्रीय दारूगोळा भांडारात नव्याने रूजू झालेले कमान्डन्ट ब्रिगेडीयर संजय सेठी यांच्याशी खासदार रामदास तडस यांनी शनिवारी विविध समस्यांवर चर्चा केली. यात स्थानिक पंचधारा स्मशानभूमीचे दोन कोटी रुपयांचे सौंदर्यीकरणाचे काम सैनिकी प्रशासन व नगर प्रशासन यांच्यातील जागेच्या वादामुळे एक वर्षापासून रखडले आहे. ते त्वरित मार्गी लागावे या दृष्टीने तसेच स्थानिक रेल्वे स्थानकावर ओखापूरी व नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना थांबा मिळावा, याबाबत चर्चा झाली. या दोन्ही समस्या केंद्रीय रेल्वे मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाशी संपर्क साधून सुटणार असल्याचे खासदार तडस यांनी सांगितले. या दोन्ही समस्यांबाबत केंद्रीय दारूगोठा भांडाराने सकारात्मक भूमिका घेऊन मंत्रालयाच्या नावे निवेदनही खासदार तडस यांना सादर केले. स्मशानभूमीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी वर्धा येथील उपविभागीय अधिकारी स्मशानभूमीची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ब्रिगेडीयर सेठी यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सैनिकी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यास नवजीवन व ओखापूरीचे थांबे व स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
स्मशानभूमी सौंदर्यीकरणाचे काम लागणार मार्गी
By admin | Published: September 14, 2015 2:04 AM