अधिवेशन काळात तात्काळ बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश सेलू : कापसाची खरेदी करुन ८ कोटी रुपयांनी शेतकऱ्यांची फसगत करणाऱ्या श्रीकृष्ण जिनिंग मालकाकडून थकीत रक्कमेचे वाटप केले नाही. या घटनेला दोन वर्षांचा कालावधी लोटला. त्रस्त शेतकऱ्यांनी येथील बाजार समिती समोर बुधवार पासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने बाजार समितीतील खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प होते. आंदोलनासंदर्भात शेतकऱ्याचे प्रतिनिधी रामनारायण पाठक व मनोज शिंदे यांच्यासोबत आ. डॉ. पंकज भोयर यांनी मुंबई येथे चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आ. भोयर यांनी चर्चा करुन शेतकऱ्यांची आठ कोठी रुपये देण्यावर मार्ग काढण्याची विनंती केली. या विनंतीनुसार सदर प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात अधिवेशन काळात तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. बैठकीची वेळ व तारीख अद्याप निश्चित केली नीही. आंदोलनामुळे बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले.(तालुका प्रतिनिधी)
तिसऱ्या दिवशीही बाजार समितीचे व्यवहार ठप्प
By admin | Published: March 25, 2017 1:16 AM