नयना गुंडे : वर्धिनी महोत्सवाचे उद्घाटन वर्धा : दिनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षित झालेल्या बेरोजगार युवकांना मोठ्या शहरामध्ये रोजगाराची संधी मिळाली आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटानी उत्पादित केलेल्या उत्पादनाला मोठ्या शहरामध्ये बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी शुक्रवारी वर्धिनी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र जीवनोन्नती प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जुने आर.टी.ओ. कार्यालयाच्या मैदानावर १७ ते २० मार्च या कालावधीत आयोजित वर्धिनी महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुखय कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्यामलता अग्रवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक प्रमोद पवार, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन. मेश्राम, दिलीप अग्रवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम. मेसरे, कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर, कार्यकारी अभियंता तेलंग, काळबांडे, रजत मेश्राम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रविण धाकटे यांची उपस्थिती होती. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान वर्धा : या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच एका स्वयंसहाय्यता महिला बचत गटाला केंद्र शासनाचा मुख्यमंत्र्यांचे हस्ते एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेल्या बचत गटाचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना गुंडे म्हणाल्या, स्वयंरोजगाराचे बीज स्वयंसहाय्यता समुहातून रोवल्यास महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. महोत्सवाच्या माध्यमाने बचत गटाच्या उत्पादीत मालाला बाजारपेठे मिळण्यास मदत होईल. यासाठी बचत गटानी तयार केलेल्या मालाची पॅकेजींग, गुणवत्ता व प्रचार महत्त्वाचा आहे. गटानी मालाची गुणवत्ता वाढविल्यास मोठ्या शहरातील मॉलमध्ये मागणी वाढून जास्तीत जास्त कुटुंबांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध होईल. विवेक इलमे यांनी ज्या महिलांनी उत्पादन केले. त्या महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठे मिळणे आवश्यक आहे. नामांकीत कंपनीच्या मालापेक्षा बचत गटांनी तयार केलेले उत्पादन चांगल्या प्रतीचे असून सुद्धा बाजारपेठ मिळत नाही. यासाठी महिलांनी बाजारामध्ये कोणत्या उत्पादनाला मागणी आहे. अशाच पद्धतीच्या मालाचे उत्पादन करावे, असे सांगितले. प्रास्ताविक प्रमोद पवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सचिन गोडे केले तर आभार अविनाश गोहाडे यांनी मानले. कार्यक्रमाला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)
बचत गटाच्या उत्पादनाला शहरात बाजारपेठ मिळावी
By admin | Published: March 18, 2017 1:07 AM