लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनाच मास्क घालून बहुधा सर्वांनीच चित्रपट, मालिकांमध्ये पाहिलेले असेल. कोरोनाने जगभरात थैमान घातले आणि मास्कचा वापर, पर्यायाने मागणीही वाढली. मास्क निर्मितीत विविध संस्था, कंपन्या उतरल्या. गोपुरीच्या ग्राम सेवा मंडळाने एक पाऊल पुढे टाकत देशी (सेंद्रिय) कापसापासून मास्क तयार केलेत. हे मास्क आज सातासमुद्रापार पोहोचले आहेत.
मार्च महिन्यात भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. विषाणूपासून सुरक्षेसाठी मास्कची मागणी वाढली. गोपुरी येथील ग्राम सेवा मंडळाने अस्सल सेंद्रिय कापसाच्या कापडापासून मास्क बनवायला सुरुवात केली. इंग्लंडमधील खादीमध्ये कार्यरत मित्रांना सुरुवातीला मास्कचे नमुने पाठविण्यात आले. तेथे त्यांनी ते विक्रीला ठेवले. इंग्लंडमध्ये हे सेंद्रिय मास्क ग्राहकांच्या चांगलेच पसंतीला उतरले आणि हळूहळू मागणी वाढू लागली. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आणि ग्रामसेवा मंडळाशी जुळलेले किशोर शहा व त्यांच्या मित्र परिवाराने या मास्कमध्ये विशेष रुची दाखविली. मास्कच्या आता चांगल्या ऑर्डर तेथे मिळत असून सेंद्रिय कापसापासून निर्मित खादीच्या मास्कचा इंग्लंड प्रवास सुरू झाला आहे. स्वातंत्र्यलढ्यात खादीने बंडाचा झेंडा रोवला. आता कोरोनापासून संरक्षण आणि हाताला काम अशी दुहेरी भूमिका पार पाडणाºया खादीने मास्कच्या रूपात कोरोनाच्या लढ्यातही योगदान दिले आहे.
खादीने उघडली रोजगाराची दालनेसेंद्रिय कापसाचा हा मास्क दिलेल्या इंग्लंडमधून पाठविलेल्या डिझाईननुसार मापातच तंतोतंत शिवावा लागतो. त्यावर अतिशय बारीक काम करावे लागते. एक मास्क शिवायला जवळपास २० ते ३० मिनिटे लागतात, असे कारागीर गणेश खांडसकर यांनी सांगितले. कोरोना संकटकाळात खादीने रोजगार मिळवून देण्यासाठी हातभार लावला, ग्रामीण भागात आता खादी मोठे रोजगाराचे साधन बनल्याचे ते लोकमतशी बोलताना म्हणाले.
खादी मास्क जपतेय वेगळेपण१९३४ मध्ये भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी ग्रामसेवा मंडळाची स्थापना केली. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार, त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांतून हे मंडळ उदयास आले. येथे कापसापासून कापड निर्मितीची प्रक्रिया केली जाते. डिझाईन, लांबी, रुंदी, शिलाईचेदेखील काम केलेजाते. बाजारपेठेत वैविध्यपूर्ण मास्क उपलब्ध असले तरी खादीपासून निर्मित हे मास्क आपलं वेगळंपण जपून आहेत.
जवळपास एक महिना बारीक काम केल्यावर इंग्लंड येथे मास्क पाठवण्यात आले आहेत. हे मास्क पसंतीला उतरत असून ग्रामसेवा मंडळाला एक हजार मास्कची ऑर्डर मिळाली आहे. हे मास्क श्वसनाला चांगले असून घाम आला तरी त्रास होत नाही. निर्जंतुकीकरण करता येते. गरम पाण्यातही धुवून वापरता येतात. लवकरच नवीन आॅर्डर मिळतील, असा विश्वास आहे.करुणा फुटाणे, अध्यक्ष, ग्रामसेवा मंडळ, गोपुरी, वर्धा.