राष्ट्रीय महामार्ग ७ वरील घटना हिंगणघाट : ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात मागच्या चाकात आल्यामुळे दुचाकीवरील मामा-भाची चिरडल्या जावून जागीच ठार झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील तेलंग पेट्रोल पंपाजवळ गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास झाला. प्रिया संजय निमसडकर (२१) रा. सोनेगाव (राऊत) आणि धनराज जनार्दन घोडे (४२) रा. बरबडी असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, धनराज घोडे हे त्यांच्या भाचीला घेवून बरबडी येथून सोनेगाव (राऊत) कडे दुचाकी क्र. एमएच ३१ ई २७०४ ने जात होते. हिंगणघाट शहरात प्रवेश करता विरूध्द दिशेने येत असलेल्या ट्रक क्रमांक एमएच ३२ बी ९४०७ ला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवरील दोघेही पडले. त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. प्रिया निमसडकर हिचा साखरपुडा झाला असल्याची माहिती आहे. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी वासुदेव सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. घटनेतील वाहन ताब्यात घेण्यात आले असून चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.(तालुका प्रतिनिधी)
ओव्हरटेकच्या नादात मामा-भाची ठार
By admin | Published: December 30, 2016 12:32 AM