सेलू (घोराड) : अवैध दारूविक्रीसह आता परिसरात जुगार, मटका व्यवसायालाही तेजी आल्याचे चित्र दिसून येत आहे. गावागावात मटका घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता नागरिकांतून केल्या जात आहे. वरळी मटका घेणाऱ्यात आता युवक उतरले असून, याची चैन लांबलचक असल्याचे सांगितले जाते.
एका रुपयाला १० रुपये देणारा हा व्यवसाय लपून, छपून चालत होता. ओपन टू क्लोजमध्ये खेळला जाणारा हा एक प्रकारचा जुगार संसार उद्धवस्त करणारा ठरत आहे. मागील काही महिन्यांपासून गावागावातील चौकात बसून या व्यवसायाची खुलेआम सट्टापट्टी बनविली जात आहे. यात सट्टा लावणाऱ्याची संख्या मोठी आहे. सट्ट्याचे आकडे मोबाईलवर पाहायला मिळत असल्याने या व्यवसायात विश्वास आहे. पण, यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत असले तरीही हा व्यवसाय नगदी व उधारीवर चालत असल्याचे सांगितले जाते.
एका गावात चार व्यक्ती हा व्यवसाय करीत असल्या तरी एखाद्या व्यक्तिला पोलीस टार्गेट करीत आहेत. इतरांना मुभा दिली जात असल्याचे वास्तव आहे. मात्र, यात मोठे मासे सहभागी असल्याची चर्चा आहे. रोज मजुरी देऊन सट्टापट्टी घेण्यास युवकांना यात रोजगार दिला जात आहे. यावर आळा बसणार नाही, हे सर्वसामान्य नागरिकांना माहिती आहे. मात्र, अवैध व्यवसायावर आळा बसविण्यास असलेली यंत्रणा कमी पडते आहे, की अर्थपूर्ण संबंधातून याकडे दुर्लक्ष केले जात आहे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण
मागील काही महिन्यांपासून सेलू व सभोवतालच्या गावात अवैध व्यवसायांना ऊत आला आहे. त्यामुळे पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. खुलेआम चालणाऱ्या या धंद्यावर आळा घालावा, अशी मागणी होत असली तरी या मागणीकडे कानाडोळा होत असल्याचे एकंदरित चित्र दिसून येत आहे.