वर्धा : जिल्ह्यात सध्या गोवरच्या आजाराने डोके वर काढले आहे. बालकांच्या हातापायाला बारीक बारीक चट्टे येत आहे. ही साथ ‘ब्रेक’ करण्यासाठी बालकांचे लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात १० हजार ८७४ बालकांना पहिला डोस, तर ९९०० बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिला व दुसरा डोसपासून वंचित बालकांना बालकांना संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे बालकांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन डॉ. मंगेश रेवतकर यांनी केले आहे.
बालकांमध्ये गोवरच्या आजाराची साथ सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातही आरोग्य विभागाकडून बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. गोवर आजार जडू नये म्हणून माता व बाल संगोपन विभागाच्या माध्यमातून गावागावांत सर्वेक्षण सुरू आहे. बालकांच्या रक्ताचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहेत. आरोग्य विभागाच्या माता व बालसंगोपन विभागातील डॉक्टरांची चमू अलर्ट झाली असून, आठही तालुक्यांत सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे.
२९८ नमुन्यांत ७ पॉझिटिव्ह
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. जिल्ह्यात २९८ बालकांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आसता, यापैकी सात बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वेळीच योग्य उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.
ही आहेत ‘गोवर’ची लक्षणे
- ताप, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे.
- अशक्तपणा, घशात दुखणे, अंग दुखणे.
- तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसणे.
गोवरची काळजी
जन्मानंतर नऊ महिन्यांनी पहिला डोस १०,८७४
१९ महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा डोस ९९००
जिल्ह्यात पहिला व दुसऱ्या डोसचे जवळपास २० हजार ७७४ बालकांचे लसीकरण झाले आहे. २९८ रक्त नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वेळीच उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती ठीक आहे. भविष्यात गोवर संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी आठही तालुक्यांत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात गोवरची साथ नियंत्रणात आहे.
डॉ. मंगेश रेवतकर, जिल्हा व माता बालसंगोपन अधिकारी
तालुकानिहाय लसवंत बालके
*तालुका - पहिला डोस - दुसरा डोस*
- वर्धा - ३६२३ - ३४२७
- सेलू - ९८४ - ८१५
- देवळी - ११६३ - ११४३
- आर्वी - ११११ - १०४२
- आष्टी - ५७७ - ४९२
- कारंजा - ६९० - ५८६
- समुद्रपूर - ९०५ - ७७८
- हिंगणघाट - १८२१ - १६१७