लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्ध्याच्या साहित्य व कलाक्षेत्रात योगदान देणारे ज्येष्ठ रंगकर्मी प्राचार्य जयंत मादुस्कर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘स्मृतिगंध’ या सुश्राव्य व देखण्या मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तब्बल तीन तास चाललेल्या या दर्जेदार व अभिनव अशा दृकश्राव्य कार्यक्रमाला वर्धेकरांची भरगच्च उपस्थिती लाभली होती.सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय, संस्कार भारती आणि मादुस्कर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात ‘वेदमंत्राहूनी आम्हा वंद्य वंदे मातरम्’ या गीताने करीत पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यापाठोपाठ जयंत मादुस्कर यांच्या स्वरातील ‘दूध नको पाजू हरीला’ हे गीत दुर्मिळ छायाचित्रांसह मोठ्या एलईएडी पडद्यावर सादर करण्यात आले.या गीतांचा मागोवा घेत अनघा रानडे, नितीन वाघ, अरूण सुरजूसे, केतकी कुळकर्णी, कवीनेसन, सुनील रहाटे व डॉ. भैरवी काळे या गायकगायिकांच्या सुमधुर स्वरांची जिंदादिल मैफल सुरू झाली. ‘माझ्या प्रितीफुला, जीवनात ही घडी, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, स्वर आले दुरुनी, तोच चंद्रमा नभात, अशी पाखरे येती, हृदयी प्रीत जागते, जीवलगा कधी रे येथील तू, तुझ्या गळा माझ्या गळा, चंद्र आहे साक्षीला, एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात, राजा ललकारी अशी दे, गोमू माहेरला जाते हो नाखवा, सखी मंद झाल्या तारका, फिरूनी नवे जन्मेन मी, नवीन चंद्रमा, येगं येगं निद्राराणी, माधवा युध्द कशाला करू, कानडा राजा पंढरीचा’ अशा सरस भावगीत व भक्तिगीतांच्या स्वरधारेत रसिक अक्षरश: न्हाऊन निघाले. अस्सल मराठी बाज जोपासत ‘दूर व्हा जाऊ द्या, बुगडी माझी सांडली गं आणि बाई माझी करंगळी मोडली’ या ठसकेदार लावण्यांचा मेडलेही मैफलीत सादर झाला. जयंत मादुस्करांनी संगीतबध्द केलेल्या कवी अनंत भीमनवारांच्या ‘छप्पर भिंती खडू फळ्याविन अशी असावी, तारावरी पारावरी पाखरांची शाळा, ऋतुंना विचारू या गं ऋतुसंगे बोलू’ या रचनाही चोखंदळ रसिकांची दाद मिळवून गेल्या. तर गदिमा आणि सुधीर फडके यांच्या स्मृतींना उजाळा देत गीतरामायणातील तेरा अवीट रचना सलग सादर करून गायकांनी संपूर्ण वातावरणच भक्तिमय केले.या मैफलीत गायकांना सुरमणी वसंत जळीत (व्हायोलिन), नरेंद्र माहुलकर (संवादिनी), रवी खंडारे (बासरी), प्रवीण चहारे (सिंथेसायझर), मंगेश परसोडकर, अनिल दाऊतखानी (तबला) आणि राजेंद्र झाडे (आॅक्टोपॅड) यांची सुरेल साथ लाभली. अॅड. अजित सदावर्ते यांचे मोजक्या शब्दांतील निवेदन या मैफलीसाठी साजेसे व समर्पक असेच होेते.या कार्यक्रमात ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त, गौतम बजाज, साहित्यिक डॉ. सुनीता कावळे, प्रा. सरोज देशमुख, शालिनी मादुस्कर, डॉ. आनंद सुभेदार, शंकरप्रसाद अग्निहोत्री, संगीततज्ज्ञ प्रा. डॉ. श्याम गुंडावार, प्रा. विकास काळे, प्रदीप बजाज, गौरीशंकर टिबडेवाल, प्रा. रा.मो. बैंदूर, सतीश बावसे, संजय इंगळे तिगावकर, सुनीता लुले, गोडबोले, शीला पांडे, विलास कुळकर्णी, शंकर गोंधळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जयंत मादुस्कर यांच्या स्मृतींना उजाळा देणारी संवादी क्षणचित्रे चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली. कार्यक्रमाची ध्वनी व प्रकाश योजना प्रशांत कोल्हे यांनी सांभाळली. तर चित्रफितींचे दृश्य संपादन भूषणप्रसाद कावळे व दिलीप मादुस्कर यांनी केले.नियोजित वेळी सुरू झालेल्या या दर्जेदार कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता संयोजक दिलीप अरूण मादुस्कर, सुप्रिया मादुस्कर, मकरंद उमाळकर, अनिल पाखोडे, डॉ. माधुरी काळे, वसंत देशपांडे, मिलिंद जोशी, प्रफुल्ल व्यास, पंकज घुशे, नरेंद्र नरोटे, राहुल तेलरांधे, प्रसाद देशपांडे यांच्यासह स्मृतिगंध समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.
‘स्मृतिगंध’ने सुरेल आठवणींना उजाळा, रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 9:54 PM
वर्ध्याच्या साहित्य व कलाक्षेत्रात योगदान देणारे ज्येष्ठ रंगकर्मी प्राचार्य जयंत मादुस्कर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘स्मृतिगंध’ या सुश्राव्य व देखण्या मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तब्बल तीन तास चाललेल्या या दर्जेदार व अभिनव अशा दृकश्राव्य कार्यक्रमाला वर्धेकरांची भरगच्च उपस्थिती लाभली होती.
ठळक मुद्देजयंत मादुस्कर स्मृतिप्रीत्यर्थ दृकश्राव्य मैफल : सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयात आयोजन