जागतिक चिमणी दिनाचा विशेष कार्यक्रम : प्राथमिक शाळा विजयगोपालचा उपक्रमवर्धा : चिमणीचे सुंदर शिल्प साकारत ‘माय स्पॅरो, सेव्ह स्पॅरो’चा नाद करीत जि.प. प्राथमिक शाळा विजयगोपाल येथील विद्यार्थ्यांनी चिमण्या वाचविण्याचा संदेश दिला. जागतिक चिमणी दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम लक्षवेधक ठरला.स्पॅरो नेचर क्लब, प्राथमिक शाळा विजयगोपालतर्फे चिमणी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १८ मार्च रोजी घरटे बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. टाकाऊ वस्तुपासून विद्यार्थ्यांनी ४० घरटी तयार केली. तथा बॉटलचा उपयोग करून पाणी भांडे व खाद्यपात्र तयार केले. १९ मार्च रोजी चिमणी गणना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सकाळच्या वेळेत आपल्या ओळखीच्या घरी जाऊन काही प्रश्न विचारले आणि निरीक्षण केले. यात आढळून आलेल्या चिमण्यांची नोंद एका स्लीपवर घेण्यात आली.सोमवारी आयोजित कार्यक्रमात चिमणीच्या भव्य आकारात जमिनीवर रेखाटलेल्या चित्रावर विद्यार्थ्यांना बसवून एक प्रतिकृती साकारण्यात आली होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे विद्यार्थ्यांनी तयार केलेली घरटी देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे मान्यवरांनी कौतुक केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश जयसिंगपुरे, उपाध्यक्ष ज्योती पारिसे, संजय अवसरे, प्रवीण विलायतकर, सुचिता टेकाम, सोनाली तेलंगे यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुचिता देशमुख यांनी केले. किशोर कामडी, राजेश बारई यांनी चिमणी शिल्प साकारले. उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता ललिता शुक्ला, अजय पवार, दिलीप वीरखडे या शिक्षकांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)विद्यार्थ्यांनी केलेल्या गणनेत ८९५ चिमण्यांची नोंदप्राथमिक शाळा विजयगोपाल येथील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी गणना केली. ते राहत असलेल्या घरासह शेजारच्या घरी जाऊन विचारणा व निरीक्षण केले. आढळलेल्या चिमण्यांची नोंद एका स्लिपवर घेण्यात आली. ६० विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला व एकूण ८९५ चिमण्यांची घर व परिसरात नोंद करण्यात आली. सदर संख्येची नोंद ‘इ-बर्ड’ या संकेतस्थळावर करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक दिलीप वीरखडे यांनी याप्रसंगी मान्यवरांना दिली.
शिल्प साकारत दिला चिमणी वाचविण्याचा संदेश
By admin | Published: March 21, 2017 1:22 AM