हिंगणघाट पोलिसांची कामगिरी : अधीक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : येथील बसस्थानकावर प्रवाशांकडील मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला जेरबंद करुन गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल पोलीस पथकाला सन्मानित करण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस हवालदार निरंजन वरभे, अरविंद येनुरकर, दीपक जंगले, ऋषीकेश घंगारे यांना पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. तसेच अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. पोलिसांना मिळलेल्या माहितीवरुन नांदगाव चौरस्ता येथे सापळा रचण्यात आला. या पथकाने अत्यंत शिताफीने उत्तरप्रदेश येथील रहिवासी असलेल्या नऊ जणांना अटक केली. यातील या कारवाईत प्रवाशांच्या बॅगच्या चैन व बॅग कापण्याकरिता वापरण्यात येणारे कटर, रोख, सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार असा ऐवज जप्त केला. या टोळीची विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर टोळीने बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगमधून दागिने चोरल्याचा संशय निरंजन वरभे यांनी कसून चौकशी केली. यातील सर्व आरोपी जिल्हा अलीगढ व हातरस, उत्तरप्रदेश येथील रहिवासी असल्याचे उघड झाले. या कारवाईत २ लाख २२ हजार ३४६ रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन सखोल चौकशी करण्यात आली. पुढील तपासात या टोळीचा संपर्क उत्तरप्रदेश येथील अलीगढचा रहिवासी असलेल्या सोनारासोबत असल्यकहे उघड झाले. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन १७ दिवसांची पोलीस कोठडी घेतली. यानंतर हिंगणघाट ठाण्यात ९ गुन्हे, वर्धा येथे १, वडनेर येथे १, पोलीस स्टेशन सेलू येथे १ व पोलीस स्टेशन देवळी येथे १ असे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. हिंगणघाट पोलिसांच्या कामगिरीमुळे प्रवासात होत असलेल्या चोरीच्या घटनांना आळा बसला आहे. ही कारवाई प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे, ठाणेदार राजेंद्र शिरतोडे, ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे यांच्या मार्गदर्शनात केली.
महिलांचे दागिने लुटणारी टोळी जेरबंद; पोलिसांचा सन्मान
By admin | Published: June 26, 2017 12:40 AM