गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजन : चिमुकल्यांच्या मनोरंजनावर दुर्लक्षाचे सावट पुलगाव : नावलौकीक असलेला पुलगावच्या गणेशोत्सवाचा रंग आज उतरत चालला असला तरी येथे येणाऱ्यांची संख्या कमी नाही. शहरातील काही गणेश मंडळांकडून ही परंपरा राखण्याचा प्रयत्न असला तरी नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या उत्सवाच्या आनंदावर विरजन पडत आहे. मीना बाजाराच्या जागेचा अद्याप निर्णय नसल्याने बाजारावर उदासिनतेचे सावट आहे. संपूर्ण विदर्भात नावलौकिक असलेला पुलगाव कॉटन मिलचा गणेशोत्सव गत काही वर्षांपूर्वी बंद झाला. शहरातील काही नामवंत गणेश मंडळे ही परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरात गणेशोत्सव काळात येथील सर्कस मैदानावर मोठा मीना बाजार भरतो. यातून शहरात लाखो रुपयांची उलाढाल होवून शेकडो बेरोजगारांना उदरनिर्वाहाचा मार्ग मिळतो; परंतु जिल्हा प्रशासन व नगर प्रशासनाच्या धोरणामुळे गणेश पर्वाचे पाच दिवस लोटूनही उदासिनतेचे सावट कायम आहे. पूर्वी या गणेश उत्सवादरम्यान मोठी सर्कस, विविध प्रकारचे झुले आणि मनोरंजनाच्या साधनासह विविध प्रकारच्या साहित्याचे कित्येक स्टाल लागत होते. गणेश पर्वाच्या प्रारंभापासून शहरात रेलचेल राहत होती; परंतु यावर्षी पाच सहा दिवस लोटूनही मीना बाजार सुरू न झाल्यामुळे शहरवासियांच्या पदरी निराशाच पडते की काय असे वाटू लागले आहे. दरवर्षीच गणेशोत्सव येतो व मीना बाजारही येतो; परंतु नगर परिषद प्रशासन तहान लागल्यावर विहीर खोदते. हाच प्रकार मीना बाजाराच्या जागा वाटपाबाबत सुरू असल्यामुळे मीना बाजारात मनोरंजन आणि विविध वस्तूंचे स्टाल अद्यापही लागले नाही. पूर्वी मीना बाजाराच्या जागेचे नियोजन गणेश पर्वापूर्वी १५ दिवस आधीच व्हायचे; परंतु संबंधित नगर प्रशासनाच्या उदासिनतेमुळे व जागेच्या होणाऱ्या लिलावामुळे मीना बाजारात येणारे दुकानदार नाराज असल्याचे समजते. शिवाय या दुकानाकरिता लागणारा विद्युत पुरवठा, सुरक्षा या सर्व बाबीमुळे अजूनही मीना बाजार सुरू झाला नसल्याने शहरवासीयांच्या उत्साहावर विरजन पडत असल्याचे दिसत आहे. चार दोन गणेशाचे दर्शन घेवून हिरमुसल्या चेहऱ्याने नागरिक परत येतात. भविष्यात गौरवशाली परंपरा लाभलेला हा गणेशोत्सव इतिहास जमा तर होणार नाही ना अशी भीती शहरवासी व्यक्त करीत आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)
जागेच्या वादात अडकला मीना बाजार
By admin | Published: September 12, 2016 12:46 AM