सुरभी शिरपूरकर, लोकमत
फुटपाथवरची शाळा पाहिल्यानतंर तुम्हाला प्रश्न पडेल की ही शाळा फुटपाथवर का भरते....बरोबर ना! आज ही आपल्या देशात अनेक घटकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. त्यांच्या पैकीच एक म्हणजे वर्ध्यातील म्हसाळ्याची वडर वस्ती....यावस्तीकडे समाजसेविका मीनल नैताम यांचं लक्ष गेलं आणि या वस्तीचा शैक्षणिक दृष्ट्या कायापालटच झाला.
समाज कार्याची आवड असलेल्या मीनल यांची एक दिवशी वडार वस्तीवर लक्ष गेलं. तेव्हा इथली लहान लहान मुलं जुगार खेळताना तर काही जण धुम्रपान करताना आढळली. काही तर विनाकारण टवाळक्या करण्यात दंग होती. हे विदारक परिस्थिती पाहून त्यांचं मन हेलावलं. त्यांनी निश्चय केला. यासर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्या कामालाही लागल्या. त्यातून प्रत्यक्षात आली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले फुटपाथ शाळा...
सुरुवातीला पालकांना विश्वासात घेवून त्यांच्याबरोबर मीनल यांनी चर्चा केली. घरोघरी जावून मुलांना शाळेत आणावं लागत होतं. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत मुलं शाळेत येऊ लागली. मात्र त्यांचं पाहून आता तब्बल चाळीस मुलं या फुटपाथ शाळेत येतात.
मीनल यांनी हाती घेतलेल्या या कार्याचं सर्वत्र कौतूक होत आहे. या शाळेतील मुलं एक ना एक दिवस नक्की काही तरी करून दाखलतील असा विश्वास त्यांना आहे. पण त्याचबरोबर सरकारी मदतीचीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र सध्या तरी वडर वस्तीवरील विद्यार्थ्यांसाठी मीनल या आधुनिक सावित्रीच ठरल्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.