लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या आवारात खुलेआम दारू रिचवल्या जात असल्याचे परिसरात मिळून आलेल्या दारूच्या बाटल्यांच्या खचावरून दिसून येते. जि.प.च्या आवारात दारू रिचवणारे ते कोण, असा प्रश्न उपस्थित होत असून याकडे कुण्याही बड्या अधिकाऱ्याचे लक्ष नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी तालुकास्तरावरून नागरिक येत असतात. मात्र, या परिसराचा फेरफटका मारला असता मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच दिसून आला. त्यामुळे कार्यालयात काम करणारे अधिकारी, पदाधिकारी तर रात्रीच्या सुमारास दारू रिचवत नसतील ना, असा प्रश्न सहज उपस्थित होतो आहे. याकडे मात्र, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. अशा मद्यपी कर्मचाऱ्यांवर तत्काळ आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.यापूर्वी देखील जिल्हा परिषदेच्या परिसरात दारुच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे कार्यालयीन वेळेत तर दारुचे घोट रिचविल्या जात नसेल ना, असा प्रश्न आहे.
नादुरुस्त शासकीय वाहनात दारूची साठवणूक करणारा तो कोण?- जिल्हा परिषदेच्या मागील बाजूस असलेल्या शासकीय नादुरुस्त वाहनात एक व्यक्ती दारू घेऊन येतो. तो दारूसाठा नादुरुस्त असलेल्या शासकीय वाहनात ठेवुन रात्रीच्या सुमारास परिसरात ओली पर्टी करण्यात येते. त्यामुळे रात्रीच्या सुमारास दारू घेऊन येणारा तो पदाधिकारी कोण, हे शोधण्याची गरज आहे. जि.प. अध्यक्षांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता
प्रशासनाने नेमले भरारी पथक...- जिल्हा परिषदेच्या आवारात दारुच्या बाटल्यांचा खच दिसून आल्यावर जि.प.प्रशासनाने भरारी पथक नेमले आहे. हे पथक प्रत्येक कार्यालयात आकस्मिक भेटी देणार आहे. तसेच कुठलाही बेजाबदारपणा आढळून आल्यास त्याची जि.प. अध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याची माहिती जि.प. प्रशासनाने दिली आहे.
अधिकारी, पदाधिकारी अनभिज्ञ कसे?- जिल्हा परिषदेच्या आवारात सर्रास दारूच्या बाटल्या दिसून आल्याने या परिसरात दारूपार्टी नेहमीच होत असल्याचे एकंदरित चित्र आहे. मात्र, याबाबत अधिकारी आणि पदाधिकारी अनभिज्ञ कसे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्य कार्यपालन अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱी मिळून आम्ही परिसराची पाहणी केली. असा कुठलाही प्रकार दिसून आला नाही. बाहेरील व्यक्ती दारु पिऊन परिसरात बाटल्या टाकत असल्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून जि.प.च्या बदल्यांचे वारे सुरु असल्याने पाचशेवर नागरिक उपस्थित होते. त्यांच्यापैकी कुणीतरी असे कृत्य केले असावे, असे मला वाटते. मात्र, कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा दिसून आल्यास कारवाई करण्यात येईल. सरिता गाखरे, जि. प. अध्यक्ष.