चोरट्या वाहतुकीला दिली जाते खुली सूट लोकमत न्यूज नेटवर्क आकोली : नजीकच्या येळाकेळी येथे गिट्टी खदान आहे. गौण खनिजाची नियमात काटेकोरपणे वाहतूक व्हावी म्हणून गौण खनिज तपासणी नाका आहे. नाक्यावर तीन पाळीत कर्मचारी नियुक्त आहेत; पण तपासणी नाका कुलूपबंद करून कर्मचारी हॉटेल व पानटपरी राखत असल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. गौण खनिज नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या गायब राहण्यामागचे रहस्य लपून नाही. वाहतुकदारांच्या सोईसाठी ते गायब राहतात, अशी चर्चा आहे. येथील गिट्टी खदानवरून जिल्ह्यात गौण खनिजाचा पुरवठा होतो. त्यावर नियंत्रण असावे म्हणून महसूल विभागाने गौण खनिज तपासणी नाका बांधला. २४ तास कर्मचाऱ्यांचे लक्ष राहावे म्हणून तीन पाळीत कर्मचारी नियुक्त केले. नियमात राहून वाहतुकदारांनी गौण खनिजाची वाहतूक करावी, हा उद्देश होता. येथील नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे रॉयल्टी तपासणे, क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होते काय व इतर कायद्याने ठरवून दिलेला बाबींची तपासणी करणे अपेक्षित असते; पण चिरीमिरीच्या व्यवहारात सर्व कायदेशीर प्रक्रियेला छेद दिला जात आहे. यामुळे कुंपणच शेत खात असल्याचा प्रत्यय येतो. बसायला सुसज्ज इमारत असताना नाका कुलूपबंद करून इतरत्र बसण्याचा हेतू काय, हा प्रश्नच आहे. नाक्यावर वाहन, रॉयल्टी, क्षमतेची तपासणी केली जात असेल तर नाक्यावरून बाहेर पडलेली वाहने महसूल यंत्रणेच्या धाडीत कशी सापडतात, हा प्रश्नच आहे. या प्रकरणी चौकशी करीत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
गौण खनिज तपासणी नाका कुलूपबंद
By admin | Published: May 29, 2017 1:14 AM