वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी राजेश सुरेश चिंचोले (४० रा. पुलगाव) याला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच तीन हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठाविण्यात आली. हा निर्णय अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्हि.टी. सुर्यवंशी यांनी २९ डिसेंबर रोजी दिला. तसेच पीडितेला ६ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशित केले.
संबंधित पीडिता नवव्या वर्गात शिक्षण घेत होती. दरम्यान २० ऑक्टोबर २०२० रोजी पीडितेच्या घरामागील शेतात सी.ए.डी. कॅम्प मध्ये काम करणारे लोक राहत होते. यातील आरोपी राजेश चिंचोले हा सी.ए.डी. कॅम्प मध्ये चालक म्हणून काम करायचा. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पीडिता तिच्या घरातील स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करीत असताना आरोपी मागील दारातून स्वयंपाक खोलीत आला आणि पीडितेचा हात पकडून असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. तेव्हा पीडितेने आरडा-ओरडा केला असता आई-वडील व भाऊ हे स्वयंपाक खोलीत आले. पीडितेच्या वडिलांनी आरोपीचा हात पकडून हटकले असता इंधनाच्या काठीने पीडितेच्या वडिलांना मारहाण केली. परिसरातील नागरिकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला पण आरोपीने खिशातील भाल्याचे पाते काढले व म्हणाला की, माझ्या अंगाला हात लावला तर जिवाने मारून टाकीन अशी धमकी दिली. पीडितेच्या घरच्यांनी पुलगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यावले यांनी तपास केला. नंतरचा तपास पोलिस उपनिरीक्षक सोनाली राठोड यांनी केला. आरोपीने गुन्हा केल्याचा पुरावा उपलब्ध झाल्यामुळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकार तर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना सदर प्रकरणात पैरवी सहा. फौजदार अनंत रिंगणे यांनी साक्षदाराना हजर करून मोलाची कामगीरी बजावली. शासनातर्फे आठ साक्षदार तपासण्यात आले. बचाव पक्षातर्फे एक साक्षदार तपासला. पीडित, पीडितेचे वडील व इतर साक्षदार तसेच वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकाऱ्यांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.