अतिप्रसंगाचा प्रयत्न :
आंजी येथील घटना
आकोली : आंजी (मोठी) येथे गावाबाहेरील दर्ग्याकडे जात असलेल्या ३२ वर्षीय मतिमंद मुलीला अश्विन प्रभाकर ठाकरे (२९) रा. मोरांगणा याने मिनीडोअर क्र. एमएच ३२ पी ७७३० मध्ये जबरीने बसवून दृष्कृत्य करण्याच्या हेतूने अपहरण केले. ही घटना मंगळवारी घडली. बळजबरीच्या प्रयत्नात तिच्या शरीरावर जखमा झाल्यात. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली.मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी पवनूर रोडवरील घोडखांदे यांच्या शेतातील पीर साहेब दर्ग्यावर जात होती. दरम्यान, आरोपी आॅटोचालकाने मागाहून येत तिला जबरीने वाहनात बसविले. ही बाब शेतातील मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केली. तोपर्यंत मिनीडोअर पसार झाला होता. प्रत्यक्षदर्शीनी मिनीडोअर क्रमांक लिहून घेत गावात माहिती दिली. यावरून पिडीतेच्या आईने आंजी (मोठी) पोलीस चौकीत तक्रार करताच ठाणेदार प्रशांत पांडे, पीएसआय विनोद राऊत, जमादार दिनेश गायकवाड, सचिन पवार, संजय पंचभाई व सहकाऱ्यांनी शोत सुरू केला. यात मिनीडोअर मोरांगणा पुनर्वसन नजीक टेकडीजवळ दिसला. यावरून पोलिसांनी पीर दर्गा टेकडी मोरांगणा जंगलात शोध घेतला असता आरोपी पीडित मुलीसोबत आढळला. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत आरोपीस अटक केली. या प्रकरणी अश्विन ठाकरेविरूद्ध भादंविच्या कलम ३६३, ३६६, ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी सामान्य रुग्णालयात करण्यात आली. यातील अहवालावरून गुन्ह्यांमध्ये बदल होऊ शकतो, असे ठाणेदार पांडे यांनी सांगितले. या प्रकरणी आरोपी अश्विनला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. प्रकरणाचा तपास प्रभारी ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक दराडे करीत आहेत.(वार्ताहर)