नागरिकांना मन:स्ताप : अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली वाढीव देयके वायगाव (नि.) : वीज चोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची तरतूद असताना नाममात्र कारवाई करण्यात येत असल्याने वीज चोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सोसावा लागत आहे. वीज देयकात अतिरिक्त शुल्काच्या रूपाने वाढ करण्यात आल्याने महावितरणबाबत रोष वाढत आहे.याबाबत वीज ग्राहकांनी संबंधीतांना तक्रारी केल्या. मात्र, दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सध्या महावितरकाच्या देयकात बदल झाला आहे. यात १०० युनिटपर्यंत ३.७६ रूपये व १०० युनिटच्या वर रिडींग झाल्यास ७.२१ रुपये करण्यात आले आहे. महावितरण विभागाने नवीन अॅप तयार करण्यात आले आहे. त्यासाठी एजन्सी मार्फत कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहे. ३० दिवसांच्या कालावधीत मीटर रिडींग नेणे अनिवार्य असताना ४० दिवसांनी ते नेण्यात येत असल्याने व त्यातही चुकीचे रिडींगची नोंद टाकण्यात येत आहे. फोटो घेऊनही देयकावर नो रिडींग लिहून देत आहे. चुक कर्मचाऱ्यांची आहे. मात्र, भूर्दंड ग्राहकांना बसत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जास्त दिवसाचा कालावधील लोटल्याने रिडींग जास्त होत असून जास्त दराचे देयक नागरिकांना भरावे लागत आहे. तसेच वीज चोरीचाही फटका सर्वसामान्य नागरिकांनाच सहन करावा लागत आहे. महावितरणने जर आयोगाने दर्शविलेल्या दराप्रमाणे वीज खरेदी करीत असेल तर देयकात वीज शुल्क लावण्याचा अर्थ काय, असा प्रश्न ग्राहकांना उपस्थित करीत आहे. वीज चोरीचा भार सर्व सामान्यांवर लादला जात असल्याने ते आर्थिक संकटता सापडले आहेत. वीज ग्राहकांना देयकातील वाढीव शुल्काच्या रूपाने अतिरिक्त भार माथी मारल्या जात असल्याचे दिसून येते. शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा वीज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात दिवसेंदिवस भर पडत असून याकडे संबंधीत अधिकाऱ्याने लक्ष देण्याची गरज आहे. ज्या भागातील ग्राहक वीज दयक थकबाकी ठेवतात. त्या भागातील नागरिकांना भारनियमनाचा फटका सहन करावा लागतो. सध्या रबी हंगामाची तयारी शेतकरी करीत असून भाजीपाल्यासह रब्बी पीकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना ओलीतासाठी चोविस तास विजेची आवश्यक्ता आहे. मात्र, वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधीतांनी लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)
महावितरणच्या चुकीचा भूर्दंड ग्राहकांवर
By admin | Published: November 07, 2016 12:45 AM