वर्धा : जिल्ह्यात दारूबंदी आहे; पण मागील अडीच वर्षांपासून अवैध दारू विक्री, गांजा विक्री तसेच सट्टा, जुगार या अवैध व्यवसायांना उधाणच आले आहे. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यावर आपण स्वत: पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून संबंधित बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर ‘छोटे-मोठे प्रकार चालतात; ते सुरू राहील, हवं तर माझी बदली करा, सरकार तुमचेच आहे,’ असे त्यांनी सांगितल्याचा गंभीर आरोप आयोजित पत्रपरिषदेतून भाजपचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केला आहे.
आ. डॉ. पंकज भोयर पुढे म्हणाले, वर्धा शहरासह जिल्ह्यात दारूबंदी नावालाच ठरत आहे. नागरिकांच्या विनंतीला मान देत आपण ७ मे रोजी आर्वी नाका भागातील एका जुगार अड्ड्यावर पोहोचलो. त्यानंतर धक्कादायक प्रकार पाहून पोलिसांच्याही निदर्शनास ती बाब आणून दिली. त्यानंतर काही दिवस पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू ठेवले; पण नंतर परिस्थिती जैसे थेच झाल्याने पुन्हा माझ्याकडे तक्रारी येण्यास सुरुवात झाल्या. नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनंतर आपण पोलीस अधीक्षकांना संबंधित बाब निदर्शनास आणून दिली; पण त्यांच्याकडून मिळालेले उत्तर भुवया उंचावणारेच आहे. पोलीस अधीक्षकांचा हा विषय आपण मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊ, ते या प्रकरणात योग्य निर्णय घेतील, असे सांगितले. वर्धा येथील विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेला भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली येरावार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दारूबंदीसाठी सरकारने जनमत चाचणी घ्यावी
दारूबंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागावर आहे; पण राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अल्प मनुष्यबळ असल्याने राज्यात ज्या जिल्ह्यांत दारूबंदी आहे, त्या जिल्ह्यातील या विभागाला सरकारने पुरेसे मनुष्यबळ द्यावे, अशी मागणी आपण करणार आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यात दारूबंदी नावालाच ठरत असल्याने दारूबंदी कायम ठेवायची की ती उठवायची, याविषयी सरकारने जनमत चाचणी घ्यावी. जनमताच्या बाजूने आपण राहू, असेही याप्रसंगी आ. पंकज भोयर यांनी सांगितले.
यापूर्वी वर्धा शहरात दोनवेळा झोपडपट्टीचे अतिक्रमण तसेच अतिक्रमण काढण्याची कारवाई आमदारांच्या सुचनेनुसार करण्यात आली. शहरातील अवैध धंद्याच्या विरोधात पोलिसांची मोहीम नेहमीच सुरू राहते. याबाबत सक्त सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आलेल्या आहे. यापुढेही नगरपालिकेच्या सहकार्याने अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम राबविली जाणार आहे. पत्रकार परिषदेनंतर आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याशी माझी चर्चाही सकारात्मक झाली.
प्रशांत होळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक, वर्धा