वर्धा - जिल्ह्यातील सेलसुरा येथे कारवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात 7 युवक जागीच ठार झाले. या घटनेत गोंदियाचे भाजपा आमदार विजय रहांगडाले यांच्या 25 वर्षीय अविष्कार या मुलाचेही निधन झाले. घटनेनंतर अनेक लोकप्रतिनिधींनी शोक व्यक्त केला आहे. तर, रहागडाले यांची सांत्वनपर भेटही घेत आहेत. केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रहांगडाले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी, आमदार विजय रहांगडाले यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या पत्नीसमवेत घरी भेट दिली. त्यावेळी, रहांगडाले कुटुंबीयांना भावना अनावर झाल्या होत्या. आपला 25 वर्षांचा तरुण मुलगा अपघातात गमावल्याने दु:खाचा डोंगर कुटुंबीयांवर कोसळला आहे. त्यातच, वडिल विजय यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली होती. त्यांची ही पोस्ट वाचून अनेकांच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. त्यातच, आज नितीन गडकरी यांनी भेट देताच, पुन्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. या भावनिक आणि दु:खीप्रसंगी उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.
वर्धा येथील अपघाताची घटना खूप दुर्भाग्य पूर्ण आहे. रहांगडाले परिवारासोबत माझे घरगुती संबंध आहेत म्हणून आज इथे आपल्यासह परिवारासोबत त्यांच्या कुटुबियांना भेट देण्यासाठी आलो. रहांगडाले कुटुबीयांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावे अशीच प्राथना करतो, अशा शब्दात गडकरींना भावना व्यक्त केल्या.
अपघातासाठी चौकशी समिती गठीत
अपघात कसा झाला, त्यासाठी चौकशी समिती गठीत केली आहे. तांत्रिक कारण तसेच रोड इंजिनियरचे कारण तर नाही ना. तसेच, ऑटोमोबाईलमुळे तर ही दुर्दैवी घटना घडली नाहीना, या सगळ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. आम्हाला रोड सेफ्टी (road safety) बद्दल आणखी सतर्कता बाळगावी लागेल, असेही गडकरींनी यावेळी म्हटले. देशात वर्षभरात पाच लाख अपघात होतात. साडेतीन लाख लोक अपघातात (accident) मृत्यू पावतात. तामिळनाडू सरकारने आपल्या राज्यात ५० टक्के अपघातावर नियंत्रण मिळविले असुन ५० टक्के अपघात मृत्यूवर नियंत्रण केलेले आहे. महाराष्ट्रात (maharashtra) कशा प्रकारे अपघात आम्ही टाळू शकतो, याबाबत उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केला शोक
'महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःखी झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो', अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या इतर सहा जणांची नावे -
नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएसनितेश सिंग, २०१५ इंटर्न एमबीएएसविवेक नंदन २०१८, एमबीएबीएस फायनल पार्ट १ प्रत्युश सिंग, २०१७, एमबीबीएस फायनल पार्ट २शुभम जयस्वाल, २०१७ एमबीबीएस फायनल पार्ट २पवन शक्ती 2020 एमबीबीएस फायनल पार्ट १