वर्धा - बॅचलर रोडवर असलेल्या मुरारका ले-आऊट परिसरातील एका रहिवासी महिलेची बनावट एफडी तयार करून तिच्याकडून दोन लाख रुपये हडप केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात काल दि. २२ मार्च रोजी रात्री रामनगर पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष शुभम जळगावकर यास अटक केली आहे.मनसेचे शहराध्यक्ष शुभम जळगावकर याने खोटा दस्ताऐवज तयार करून स्टेट बँक ऑफ इंडिया शिवजी चौक शाखेतील ग्राहक वैशाली सुनिल वकारे यांचे बनावट एफडीचे कागदपत्र तयार केले. तसेच बँकेचे बनावट शिक्के मारून महिलेकडून एफडीच्या नावे दोन लाख रुपये उकळले. तीन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता. सदर महिला मात्र, यापासून अनभिज्ञ होती. काल २२ रोजी वैशाली वकारे या शिवाजी चौक येथील स्टेट बँकेच्या शाखेत गेल्या असता त्यांनी एफडी दाखवून चौकशी केली तेव्हा बँक व्यवस्थापनाकडून सदर एफडी बनावट असल्याचे उघडकीस आले. सदर महिलेने याबाबत बँक व्यवस्थापकाशी संपर्क केला असता त्यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी इंदोर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे स्टेट मॅनेजर गोविंद चव्हाण यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. रामनगर पोलिसांनी याप्रकरणी मनसे शहराध्यक्ष शुभम जळगावकर याच्यावर ४२०, ४६८, ४७९ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्यास काल रात्री अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार विजय मगर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक योगेंद्रसिंह यादव करीत आहे. तपासात आणखी बनावट एफड्या उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास पोलिस करीत आहे.
बनावट शिक्क्याने एफडी तयार करून महिलेला लुबाडणाऱ्या मनसे शहराध्यक्षाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 3:55 PM