पुलगाव : मोदी सरकारने अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाचे भाव पाडले. यापुढेही भाव वाढण्याचे संकेत नाही. केवळ तीन महिन्यातच हा परिणाम दिसला तर पाच वर्षांत काय परिणाम भोगावे लागतील, याचा विचार न केलेलाच बरा, असा आरोप माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी पुलगाव येथील काँग्रेसच्या जाहीर प्रचार सभेत केला. ते म्हणाले, केंद्र सरकार चालविताना कुठलेही धोरणात्मक व जनतेच्या संदर्भातील विकासात्मक निर्णय, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्याचा अधिकार भाजपाच्या केंद्र सरकारला वापरता येताना दिसत नाही. ते वापरुही शकत नाही कारण मोदी सरकारचा रिमोट कंट्रोलच संघाच्या हाती आहे. ही मंडळी महाराष्ट्राला न्याय देणे तर दूरच वैदर्भीयांना न्याय देऊ शकणार नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. नेहरू-गांधींजी स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसला राष्ट्रमाता इंदिरा गांधींनी ताकद दिली. तर सोनियाजींनी आपल्या कर्तृत्वानी ही शक्ती भक्कम केली असून देशातील सर्व सामान्य माणसासमोर ६० वर्षातील कॉँग्रेसच्या विकासात्मक कामाचा आढावा आहे. मतदार कॉँग्रेसला कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच बहुमतात सरकार स्थापन करणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राजीव गांधी जीवनदायी योजना अन्नाधान्य सुरक्षा विधेयक व इतर लोककल्याणकारी निर्णय केवळ कॉँग्रेस राजवटीतच होवू शकले. भाजपा सरकारने राज्यातील कास्तकारांच्या कापूस, सोयाबीन या उत्पादनाला हमी भाव न देता त्यांच्या तोंडाला पाने पुसली. सत्तेचा हव्यास असलेल्या या मंडळींना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. व्यासपीठावर रणजित कांबळे, ज्ञानेश्वर ढगे, चारूलता टोकस, विजय जायस्वाल, नगराध्यक्ष मनीष साहू, रमेश सावरकर यांची उपस्थिती होती. संचालन रामेश्वर वाघ यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)
मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
By admin | Published: October 11, 2014 2:02 AM