अरूण फाळके ।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : ग्रामीण व शहरी भागातील चिमुकल्यांना शाळेप्रती आवड निर्माण होत त्यांच्या बालमनांवर विविध विषयांचे बीज रोवण्यासाठी शासनाने वॉर्ड तेथे अंगणवाडी हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन अंगणवाड्यांची निर्मिती केली. परंतु, शहरातील १५ अंगणवाड्यांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव असल्याने सध्या तेथील चिमुकल्यांना नरकयातनाच सहन कराव्या लागत आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार लोकमतच्या स्ट्रिंग आॅपरेशनदरम्यान उजेडात आला आहे.कारंजा शहरात एकूण १५ अंगणवाड्यांचा फेरफटका मारून तेथील सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली असता मन हेलावणारेच वास्तव पुढे आले आहे. अंगणवाडी क्र.१, क्र.२, क्र.३, क्र.४, क्र. १४०, क्र.१४२ येथे अस्वच्छतेने कळस गाठल्याचे चित्र बघावयास मिळाले. शिवाय तेथे प्राथमिक सोयी-सुविधाच नसल्याचे दिसून आले. हिच परिस्थिती उर्वरित आठ अंगणवाड्यांमध्ये दिसून आली. सदर अंगणवाड्यांपैकी एकाही अंगणवाडीत साधी फॅनची व्यवस्था नाही. शिवाय पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. जीर्ण झालेल्या शौचालयाचा आधार चिमुकल्यांना घ्यावा लागत आहे. हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण देणाराच ठरत आहे. शिवाय काही स्वच्छतागृहांवर टिनपत्रेच नसल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्थाच नसल्याने हे स्वच्छतागृह शोभेची वास्तू ठरत आहे. अंगणवाडीतील चिमुकल्यांना उघड्यावर प्रात:विधीसह लघुशंकेसाठी जावे लागत असल्याने स्वच्छ शहर या उद्देशालाच बगल मिळत आहे. अंगणवाडींच्या आवारात पाण्याची व्यवस्था नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना इतरांकडून पाणी उसणे घ्यावे लागत आहे. वर्गखोल्यांमध्ये पंखाच नसल्याने चिमुकल्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.१५० बालक घेतात शिक्षणाचे धडेतालुक्याचे स्थळ असलेल्या कारंजा (घा.) येथील विविध शासकीय कार्यालयात फेरफटका मारला असता बड्या अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या दालनात कूलर आणि पंख्याची व्यवस्था असल्याचे दिसून येते. परंतु, उद्याच्या प्रगत भारताचे भविष्य असलेल्या चिमुकल्यांसाठी अंगणवाडीत साधी पंख्याचीही व्यवस्था नसल्याने पं.स.च्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, शहरातील या १५ अंगणवाड्यांमध्ये तीन ते पाच वयोगटातील एकूण १५० चिमुकले विविध विषयांचे धडे घेतात. मात्र, अंगणवाडीच्या आवारात सोयी-सुविधांचा अभाव असल्याने त्यांना उघड्यावरच प्रात:विधीसाठी जावे लागत आहे.कॉन्व्हेंटला दिली जातेय पसंतीअंगणवाड्यांमध्ये प्राथमिक सोयी-सुविधाच नसल्याने पालकही आपल्या पाल्याला अंगणवाडीत पाठविण्यासाठी पसंती दर्शवित नाही. इतकेच नव्हे, तर ते सध्या कॉन्व्हेंटला पसंती देत असल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, गरिबांच्या मुलांना योग्य शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होत असल्याच्या बाता करणाºयांचेच या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राजकीय पुढारी केवळ नावालाच काय, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.अंगणवाडी क्र. १४० भाड्याच्या घरातकृषी उत्पन्न बाजार समिती मागील अंगणवाड क्र.१४० ही २०११ पासून किरायाच्या घरात आहे. उल्लेखनीय म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस स्वत:जवळून ५०० रूपये महिन्याचा किराया देत आहे. तर त्याचा परतावा सहा महिन्यानंतर शासन देत असल्याचे सांगण्यात आले. नाममात्र मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर किराया देण्याची वेळ का यावी, हाच सध्या संशोधनाचा विषय ठरत आहे. या अंगणवाडीत १८ विद्यार्थी असून येथे शौचालय, स्वच्छतागृह, विद्युत पंखा नसून जागाही छोटी असल्याने पालकसभाही घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.आहारातही दांडी?पोषण-आहार देण्याला सुरूवात येथे झाली आहे; पण सहा महिने ते ३ वर्षे वयाची मुले, गरोदर माता व स्तनदा माताची संख्या लक्षात घेऊन हा आहार दिला जात नाही. आहार पुरवठा पत्रांमध्ये असलेल्या धान्यांनुसार आहर न देतात अत्यंत कमी आहार दिला जात असल्याची ओरड अंगणवाडी कर्मचाºयांकडून होत आहे. विशेष म्हणजे तक्रार केल्यावरही कार्यवाही होत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जि.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनीच यात लक्ष देत प्रत्यक्ष पाहणी करून समस्या जाणून घेण्याची गरज आहे.कूपनलिका जमिनीत गडपउर्दू शाळेजवळील अंगणवाडी क्र.४ परिसरात पाण्याची सोय म्हणून कूपनलिका लावण्यात आली. परंतु, ही कूपनलिका सध्या अर्ध्यापेक्षा जास्त जमिनीत गडप झाली आहे. त्यामुळे पाणी घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.२०१५ पासून भत्ता नाहीचअंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना वेळोवेळी बैठकींच्या अनुषंगाने बाहेर गावी जावे लागते. त्यांना टीए-डीए मिळणे क्रमप्राप्त आहे. परंतु, २०१५ पासून काही अंगणवाडी सेविकांना हा भत्ता मिळालाच नसल्याचे सांगण्यात आले.जबाबदार व्यक्तीला भ्रमणध्वनी उचलण्याची अॅलर्जीसदर विषयी जबाबदारी व्यक्तीची बाजू जाणून घेण्यासाठी अंगणवाडी प्रकल्प अधिकारी महाडीक व पर्यवेक्षक जवादे यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
चिमुकल्यांना सोसाव्या लागताहेत नरकयातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 9:59 PM
ग्रामीण व शहरी भागातील चिमुकल्यांना शाळेप्रती आवड निर्माण होत त्यांच्या बालमनांवर विविध विषयांचे बीज रोवण्यासाठी शासनाने वॉर्ड तेथे अंगणवाडी हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन अंगणवाड्यांची निर्मिती केली.
ठळक मुद्देकारंजा (घाडगे) येथे १५ अंगणवाड्यांची दैनावस्था : प्राथमिक सोईसुविधांचा अभाव