वर्धा : मध्यप्रदेशातून मोलमजुरीसाठी सेलू भागात महाबळा येथे वास्तव्यास असलेल्या एका गरीब आदिवासी महिलेची सेवाग्राम रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर पैशाचा भरणा न केल्याने तीन दिवसांपासून तिचे जेवण बंद केल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. अन्नाने व्याकुळ या महिलेवर बाळाला रुग्णालयात सोडून मदतीसाठी भटकण्याची वेळ आली आहे.कुणीतरी मला मदत करेल का? मला न्याय मिळेल का? म्हणत पानावलेल्या डोळ्याने ही महिला पैशाअभावी बाळाला सोडून यावे लागल्याने दु:ख व्यक्त करीत होती. हृदयाला पाझर फोडणारी ही तिची व्यथा ऐकून अनेकांनी शासन तथा रुग्णालय प्रशासनाबाबत रोष व्यक्त करीत तिला जेवण दिले.मध्यप्रदेशातील बैतुल येथील कुटुंब रोजगारासाठी सेलू येथे आले. सुखनंदनची पत्नी रेखा ही गरोदर झाली. तिला प्रसूतीसाठी सेवाग्राम रूग्णालयात दाखल केले. तिथे तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसुती सात महिन्यांत झाल्याने बाळाची प्रकृती ठिक नसल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवणे गरजेचे होते. त्यासाठी सुखनंदन याने १० सप्टेंबर पर्यंत लागणारे १७ हजार ८३६ रूपयांचा भरणा केला.असे असताना रूग्णालय प्रशासनाच्यावतीने बाळाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने या महिलेने बाळासह घर गाठले. या प्रकरणी पोलिसात तक्रारही झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करताच बाळाला पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र भरलेल्या पैशाची मुदत संपल्याने रूग्णालयाने या महिलेचे जेवण बंद केले.आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकात मोडणाºया सुखनंदन सिरसाम यांच्याकडे मध्यप्रदेश शासनाचे बीपीएल कार्ड आहे. आधार कार्डही आहे. मात्र तरीही सदर महिलेवर ही परिस्थिती उद्भवली आहे.
पैशाअभावी बाळंतिणीचे जेवण केले बंद, सेवाग्राम रुग्णालयाचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 4:04 AM