पथकांची करणार निर्मिती : गैरप्रकारांना आळा घालण्याचे प्रयत्न वर्धा : निवडणूक कुठलीही असली तरी पैसा आणि दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. यातून मतदारांना विचलित करण्याचे प्रयत्न होत असतात. लोकसभा, विधासभा ते थेट ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत सुद्धा दारू, पैसा यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता निवडणूक विभाग आणि प्रशासन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत हा अवैध प्रकार घडू नये, याकडे प्रकर्षाने लक्ष केंद्रीत करणार असल्याचे दिसते. यामुळेच उच्चस्तरावर समित्या गठित केल्या जात असून निरीक्षकांकरवी पाळत ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या धामधुमीत अनेक गैरप्रकार घडतात. हे गैरप्रकार रोखण्याकरिता रस्ते, रेल्वे वाहतूक आणि बँक खात्यांतील व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मद्याची वाहतूक व पैशांच्या व्यवहारावरही निवडणूक विभागाचे लक्ष राहणार आहे. निवडणूक काळात दारू आणि पैशांची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेद्वारे जिल्ह्याच्या सिमांवर चौक्या लावल्या जातात. या ठिकाणी प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते. यात कुठे पैसा वा दारू आढळून आल्यास सदर वाहतूक करणाऱ्यासह संबंधित उमेदवारावरही कारवाई केली जाते. जि.प. व पं.स. निवडणुकीतही याकडे कटाक्षाने लक्ष ठेवले जाणार असल्याचे संबंधितांनी सांगितले. निवडणुकीत गैरप्रकारांना आळा घालणे, हे निवडणूक विभाग आणि प्रशासनाकरिता आव्हानच असते. यंदा हे आव्हान चांगल्या पद्धतीने पेलले जावे, बाहेर जिल्ह्यातून दारू वा पैसा वर्धा जिल्ह्यात येऊ नये, यासाठी कसोशिने प्रयत्न केले जाणार आहेत. वर्धा जिल्ह्यात यापूर्वी अनेकदा निवडणूक काळात पैसा आणि दारू पकडण्याच्या घटना घडल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील एका मतदार संघात वाहनात पैसे आढळून आले होते तर एका कारवाईत वाहनात दारूच्या पेट्या आढळल्या होत्या. या प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केली होती. याचा परिणाम उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेवरही झाला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत असे प्रकार होऊ नये, याकडे प्रकर्षाने लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक विभागासह प्रशासन सज्ज असून पोलीस यंत्रणाही तैनात केली जाणार आहे. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असली तरी नागपूर, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची चोरटी वाहतूक केली जाते. हा प्रकार निवडणूक काळात होत असल्यास तो उमेदारांच्या प्रचारार्थ वा मतदारांना विचलित करण्यासाठी तर होत नाही ना, याकडेही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. यासाठीही प्रशासनाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी केली जाते. आता निवडणूक काळ असल्याने ही नाकाबंदी कठोर केली जाणार आहे. सध्या प्रचार आणि अन्य कारवायांना अवधी असला तरी तत्सम प्रयत्न प्रत्येकच निवडणुकीत होतात. या निवडणुकीतील हे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असल्याचे दिसून येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
पैसे वाहतुकीवर असणार ‘वॉच’
By admin | Published: January 23, 2017 12:48 AM