जि.प. शिक्षकांच्या बदल्या : अवघड गावावरून वाद रूपेश खैरी वर्धा जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्यांचा अध्यादेश निर्गमित झाला त्या काळापासूनच बदल्यांवरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले. यंदाच्या सत्रात गावांची निवड करताना अवघड आणि सर्वसाधारण गाव अशी संज्ञा वापरण्यात येत आहे. यामुळे या गावांची व्याख्या कशी करावी यावरून शिक्षण विभागात चांगलाच गोंधळ माजला आहे. अशात शिक्षण विभागाने १२० गावांची यादी तयार करून ती प्रसिद्ध केली; मात्र या यादीवर तब्बल ५० आक्षेप आल्याने ती यादी आता नव्याने तयार करण्यात येणार आहे. परिणामी बदल्यांचे काम पुनहा रेंगाळणार असण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा असलेल्या तब्बल १२० गावांना अवघड यादीत टाकण्यात आले. तर उर्वरीत सुमारे ७८० गावांना सर्वसाधारण गावात टाकण्यात आले. यामुळे काहींकडून या यादीवर आक्षेप घेण्यात आले. तसे नवे ५० अर्ज आले असून त्यात उल्लेख करण्यात आलेल्या पूर्णच गावांना या यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांच्या कक्षात नव्याने बैठक आयोजित आहे. यात जर या गावांची निवड झाली तर ही ५० गावे नव्या यादीत समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. सध्या अंमलात येत असलेली बदलीची प्रक्रिया अयोग्य असल्याचे काही शिक्षक संघटनांकडून बोलल्या जात आहे. या संदर्भात महाराष्ट्र शिक्षक संघाच्यावतीने राज्यभर एकाच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दुसऱ्या दिवशी मोर्चा काढण्यात येत आहे. तर शिक्षण समितीकडून बदल्यांसह रिक्त जागा भरण्याची मागणी होत आहे. या शिक्षण संघटनांच्या विरोधात अवघड गावे ठरविताना शिक्षण विभागाची अडचण होत आहे. ही गावे ठरविताना साधारणत: या गावात अवागमनाचे साधन, तिथे असलेली शाळेची स्थिती, मुख्यालयापासूनचे अंतर याचा विचार करण्यात येत आहेत. तर सर्वसाधारण गावे आहे त्याच प्रकारात राहणार आहेत. यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा करून १२० अवघड गावांची यादी तयार केली होती. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात एकूण १ हजार ५०७ शाळा आहेत. यात काही गावात दोन शाळा आहेत. यामुळे यंदाच्या सत्रात शासनाच्या नियमानुयार कालावधी झालेल्या तब्बल ९०० गावांतील शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. या ९०० गावांपैकी १२० गावे अवघड यादीत टाकण्यात आले आहेत. तर ७८० गावे सर्वसाधारण यादीत येणार असल्याचे दिसून आले आहे. वर्धा जिल्ह्यात या सर्वसाधारण गावात अनेक शिक्षक २० ते ३० वर्षांपासून कार्यरत असल्याचे दिसून आले आहे, यामुळे त्यांची अवघड गावात बदली करण्यासंदर्भात शिक्षण विभागात हालचाली सुरू असल्याचे दिसून आले आहेत. तर अवघड गावातील सेवाकाळ संपलेल्या शिक्षकांना सर्वसाधारण गावात आणण्यात येणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात चांगलीच गरमागरमी सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागातील सुत्रांनी सांगितले आहे. अवघड यादीत समाविष्ट गावातील सर्वच जागा भरणार साधारणत: अवघड गावांत जाण्यास शिक्षक तयार नसल्याचे दिसते आहे. असे असले तरी अवघड गावांची यादी वाढली तरी त्या गावांतील जागा भरल्या जाणार आहे. अवघड गावातील एकही जागा रिक्त ठेवण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. शिक्षण विभागातील रिक्त पदांवर पदोन्नतीने वर्णी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सध्या बदल्यांवरून वातावरण तापत आहे. जिल्ह्यात तब्बल २४ मुख्याध्यापक आणि २०० च्यावर विषय श्ािंक्षकांच्या जागा रिक्त असून या भरण्यासंदर्भातही जिल्हा परिषदेत हालचाली सुरू असल्याचे दिसून आले आहे. या रिक्त जागा पदोन्नतीने भरणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्यावतीने बदल्यांबाबत १२० गावे अवघड यादीत टाकले आहेत. यावर काहींनी आक्षेप घेतला आहे. ते आक्षेप स्वीकारण्यात आले असून या संदर्भात मुख्याधिकाऱ्याच्या कक्षात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता उपस्थित राहणार आहे. या सर्वांत झालेल्या चर्चेअंती निकाल घेण्यात येतील. यात जर ५० आक्षेप मान्य झाल्यास या यादीतील गावांची संख्या वाढणार आहे. - किसन शेडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, वर्धा.
१२० गावांच्या यादीवर तब्बल ५० आक्षेप
By admin | Published: April 21, 2017 1:51 AM