राजेश सोळंकी
वर्धा : आर्वीतील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाल्यावर पोलीस व आरोग्य यंत्रणा खडबडून जागी होत मागील १३ दिवसांपासून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक, उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक व पोलीस अधीक्षक, एफडीएच्या अधिकाऱ्यांसह आदींनी कदम हॉस्पिटल गाठून अधिकची माहिती घेत चौकशी व तपासाला दिशा देण्याचे कार्य केले. असे असले तरी कदम हॉस्पिटलच्या प्रकरणामुळे आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
विशेष म्हणजे कोरोना संसर्ग झाल्याने उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती तज्ज्ञ सध्या सुटीवर असून, या रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध गर्भपाताचा अड्डा राहिलेल्या कदम हॉस्पिटलवर सध्या आरोग्य यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्यांचे जास्त लक्ष असून कोण केव्हा येईल, कोणती चौकशी करील, याचा काही नेम नसल्याने उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.
डॉ. नीरज कदम द्यायचा २०१८ पासून आरोग्य सेवा
अवैध गर्भपात प्रकरणात सहआरोपी असलेला डॉ. नीरज कदम आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात २०१८ पासून कंत्राटी डॉक्टर म्हणून आरोग्य सेवा द्यायचा. आरोग्य सेवा देताना त्याने अनेकांना चांगली आरोग्य सेवा दिल्याने आर्वी तालुक्याचा बालमृत्यू दरही शून्य झाला. शिवाय अनेकांना प्रसूती शस्त्रक्रिया करून जीवदानही दिले. असे असले तरी अवैध गर्भपात प्रकरणात त्याचा सिंहाचा वाटा राहिल्याने त्यास पोलिसांनी अटक केली आहे.
मुलीच्या प्रकृतीत होतेय सुधारणा
अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी असलेले दोन डॉक्टर, दोन परिचारिका आणि अल्पवयीन मुलाचे आई-वडील सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर अल्पवयीन मुलगी सध्या बालसुधारगृहात असून, तिच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.
काही वर्षांपूर्वी रूपेश मुळे हे नरबळी प्रकरण बहुचर्चित ठरले होते; पण नंतर या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. सध्या आर्वीचे अवैध गर्भपात प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करून त्यातील दोषींवर कडक कारवाई व्हायलाच पाहिजे.
- दादाराव केचे, आमदार, आर्वी