लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याचा माता मृत्यूदर व बाल मृत्यूदर शुन्यावर आणण्याकरिता २८ मे ते ९ जून या कालावधित ० ते ५ वयोगटातील बालकांचे अतिसारामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. या कालावधित निर्धारीत वयोगटातील बालकांचे आशा कार्यकर्त्यांमार्फत सर्वेक्षण करून अतिसाराची लागण असलेल्याला ओआरएस व झिंक गोळ्या देऊन उपचार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.मातांना ओआरएस द्रावण तयार करण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे. तसेच ग्राम स्वराज्य अभियानातंर्गत निवड केलेल्या जिल्ह्यातील हिवरा व कवठा (झोपडी) या गावामध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येणार आहे. येथे लसीकरणापासून वंचित राहिलेल्या गरोदर माता व बालके तसेच अर्धवट लसीकरण झालेली गरोदर माता व बालके यांचे सर्वेक्षण करून त्यांचे संपूर्ण लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत केल्यात.या बैठकीला सीईओ अजय गुल्हाणे, डीएचओ डॉ. अजय डवले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. आर.पी. गहलोत, आरएमओ डॉ. विनोद वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, फॉक्झी प्रतिनिधी डॉ. शुभदा जाजू, आय.एम.ए.चे सचिव डॉ. शंतनु चव्हाण, डॉ. सुरेखा तायडे यांची उपस्थिती होती.बैठकीत डॉ. डवले म्हणाले की, प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खासगी प्रसुती तज्ज्ञ यांच्या सेवा विनामुल्य उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे सर्व गरोदर मातांची प्रसूतिपूर्व तपासणी तज्ज्ञ डॉक्टरकडून केल्या जाते. त्यामुळे मातामृत्यू निरंक आणण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. आजारी बालकांना बालरोग तज्ज्ञाद्वारे तपासणी करून अर्भकमृत्यू शून्यावर आणण्याचे प्रयत्न होत आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयामध्ये गरोदर मातांना आवश्यक असणारी सर्व औषधी उपलब्ध आहे. तसेच नियमित लसीकरण कार्यक्रमांत प्रत्येक गावात लसीकरण सत्र आयोजित करून सर्व गरोदर माता व बालकांना पूर्ण संरक्षित करण्याबाबत, नियोजन असल्याचेही डॉ. डवले यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्याचा माता व बालमृत्यूदर शून्यावर आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:07 PM
जिल्ह्याचा माता मृत्यूदर व बाल मृत्यूदर शुन्यावर आणण्याकरिता २८ मे ते ९ जून या कालावधित ० ते ५ वयोगटातील बालकांचे अतिसारामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे.
ठळक मुद्देशैलेश नवाल : टास्क फोर्स समितीची बैठक; अतिसार पंधरवड्यात होणारे मृत्यू टाळा