जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन वर्धा : शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी तसेच सध्या विधानसभेत कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी, शुक्रवारी महात्मा फुले समता परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकार विरोधात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. सदर निवेदन जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनानुसार, शेतीसाठी पुरेशी वीज नाही, सिंचनाच्या सोयी नाहीत, दुष्काळात शेतकऱ्यांना वेळेवर पुरेशी मदत नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला सरकारच्या धोरणामुळे योग्य भावही मिळत नाही. भाजप सरकारच्या काळात गत अडीच वर्षांत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचा आकडा सात हजारावर पोहचला आहे. सरकारजवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याचे राज्यकर्ते विधाने करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. राज्यातील फडणवीस सरकारकडून कर्जमाफी मिळवणारच, असे नारे महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनादरम्यान दिले. शेतकऱ्यांवरील सर्व प्रकारचे कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पाठविण्यात आले. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्विकारले. यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ राऊत, सुधीर पांगुळ, भरत चौधरी, कवडू बुरंगे, किशोर कडू, रामदास कुबडे, जयंत भालेराव, राजहंस राऊत, केशव तितरे, संजय भगत, अभय पुसदकर यांच्यासह समता परिषदेचे कार्यकर्त्ये उपस्थित होते.(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन
By admin | Published: March 18, 2017 1:18 AM