न.प. प्रशासनाची दिरंगाई : तोडगा काढण्यासाठी खासदारांची मध्यस्थी देवळी : स्थानिक प्रहार अपंग संघटनेच्यावतीने देवळी परिसरातील अपंगांच्या रास्त मागण्यांसाठी बुधवारी आंदोलन करण्यात आले. यात न.प. कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करून पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. मागील दोन वर्षांच्या कालावधीतील अपंगांसाठी तरतूद असलेला तीन टक्क्यांचा निधी देण्यात यावा, न.प. कॉम्प्लेक्समध्ये दोन अपंगांना गाळे उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच दारिद्र्य रेषेखालील अपंगाचा घरटॅक्स माफ करण्यात यावा, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केल्या. मागील दोन वर्षांपासून मागण्यांचा पाठपुरावा व आंदोलन करूनही अपंगाना न्याय मिळत नाही, याबाबत खेद व्यक्त केला. तसेच न.प. च्या ध्येयधोरणाचा यातून निषेध करण्यात आला. नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, न.प. सदस्य नंदू वैद्य यांनी अपंगांच्या भावना जाणून घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. बाहेरगावी असलेले मुख्याधिकारी देशमुख यांनी सुद्धा मागण्या मान्य करण्याचे दूरध्वनीद्वारे सांगितले. परंतु उपस्थित सर्व अपंग लेखी आश्वासनावर अडून राहिल्याने आयोजित आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. खा. रामदास तडस यांनी अपंगासोबतच्या तडजोडीनुसार तसेच प्रत्येक्ष भेटीदरम्यान हे आंदोलन रात्री उशिरामागे घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. आंदोलनकर्त्यांत संघटनेचे प्रमोद कुऱ्हाडकर, तुषार देवढे, हनुमंत झोटींग, शैलेश सहारे, सुनिल मिश्रा, मनीष कुंजरकर, धनराज घुमे, राजू पंपनवार, हरिभाऊ हिंगवे, रामेश्वर बालपांडे, प्रमोद देऊळकर व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.(प्रतिनिधी) वेळोवेळी आंदोलन करुनही मागण्या प्रलंबितच अपंगांच्या काही प्रमुख मागण्या अद्याप निकाली काढण्यात आलेल्या नाही. त्यामुळे बुधवारी प्रहार संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यात तीन टक्के राखीव निधी आणि अपंगांना आळे देण्यात यावे, या मागण्या लावून धरल्या. यापूर्वी येथील अपंगांनी त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन केले मात्र याची दखल घेण्यात आली नाही. दोन वर्षांच्या कालावधीतील अपंगांसाठी तरतूद असलेला तीन टक्क्यांचा निधी देण्यात आलेला नाही. तसेच न.प. कॉम्प्लेक्समध्ये दोन अपंगांना गाळे उपलब्ध करून देण्यात यावे. यामुळे त्यांचा रोजगाराचा प्रश्न निकाली काढण्यात सहकार्य होईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील अपंगाचा घरटॅक्स माफ करण्यात यावा. बहुतांश अपंग हे बेरोजगार असल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो. अशात घरटॅक्स भरणे शक्य नसल्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली.
प्रहार अपंग संघटनेचे आंदोलन
By admin | Published: March 02, 2017 12:38 AM