समुद्रपूर : जिल्हा परिषदेचे माजी सभापती छत्रपती थुटे यांचा शनिवारी झालेल्या मारहाणीनंतर उपचारादरम्यान रविवारी नागपूर येथे मृत्यू झाला. त्यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याची चर्चा होती. सोमवारी दुपारी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अशोक शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी थुटे यांचा मृतदेह असलेली व्हॅन पोलीस ठाण्यासमोर उभी केली. त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी थुटे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले.छत्रपती थुटे यांच्या हत्येत सहभागी असलेल्यांचा पोलिसांना सुगावा लागला असून त्यांच्या मागावर ते असल्याचे सांगण्यात आले आहे. हत्येचा संशय गावातील काही इसमांवर असून त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होवू नये म्हणून पोलिसांकडून त्यांच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आल्याची माहिती आहे. तत्पूर्वी शिवसैनिकांनी या प्रकरणातील हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीकरिता पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून, गिरड, वर्धा, वडनेर व स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. शिवसेनेच्यावतीने मागणीचे एक निवेदन उपविभागीस पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी यांना देण्यात आले. घटनेमुळे समुद्रपूर व सावरखेड्यात तणावाचे वातावरण आहे. रविवारी जिल्हा परिषदेचे माजी सभापती छत्रपती थुटे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता नागपूर येथे नेले असता रविवारी मृत्यू झाला. सोमवारी सावरखेडा येथे अंत्यसंस्काराकरिता त्यांचा मृतदेह आणताना जिल्ह्यातील शिवसैनिक समुद्रपूर येथे मोठ्या संख्येत गोळा झाले होते. त्यांनी थुटे यांचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर ठेवला. यावेळी माजी आमदार अशोक शिंदे यांच्यासह शिवसौनिकांनी तिथेच रास्ता रोको केला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच वर्धेवरून दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले. थुटे यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याची शक्यता असल्यामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले. यावेळी शिंदे यांनी मध्यस्थी करून शिवसैनिकांना शांत केले. यावेळी तालुका प्रमुख रवींद्र लढी, प्रमोद भटे, सचिन गावंडे, प्रा. विलास बैलमारे, नारायण बादले, महादेव बैलमारे, विलास वैद्व, सनी निवटे यांच्यासह मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार; गावात तणाव४तालुक्यातील सावरखेडा येथे छत्रपती थुटे यांचा मृतदेह आणण्यात आला. गावात तणावाचे वातावरण होते. यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अंत्यसंस्काराच्यावेळी काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार झाले. यावेळी अशोक शिंदे, माजी आमदार राजू तिमांडे, अॅड. सुधीर कोठारी, हिम्मत चतुर, रमेश भोयर, अभय कोठारी, खुशाल लोहकरे, नितीन सरोदे यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते व हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
छत्रपती थुटेंच्या मृतदेहासह शिवसैनिकांचे आंदोलन
By admin | Published: July 19, 2016 2:25 AM