लोकमत न्यूज नेटवर्कआगरगाव : महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवकांच्या विविध प्रश्नांसाठी देवळी पंचायत समिती व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील ग्रामरोजगारसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते. मागण्यांवर निर्णय न झाल्यास अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवकांना नरेगाची कामे करण्यासाठी २००७ पासून ग्रामसभेमार्फत नियुक्ती करण्यात आली. तसेच ग्रामरोजगार सेवकांना गावातील मजुरांची नोंदणी करून जॉब कार्ड तयार करणे, १ ते ७ नमुने तयार करणे, मजुरांची हजेरी घेणे, बँकेत खाते उघडणे, ग्रामसेवकास मदत करणे आदी पूर्णवेळ कामे करावी लागतात.प्रतिमाह १८,००० रुपये वेतन लागू करावे, मानधन वैयक्तिक खात्यावर जमा करावे, कायमस्वरूपी नियुक्तिपत्र द्यावे, त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शासकीय विमा काढावा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.आंदोलनात जिल्हाध्यक्ष आशीष बेलमकर, चेतन येंडे, सचिन रोडे, मयूर देवघरेसह ग्रामरोजगार सेवक सहभागी झाले होते.ग्रामरोजगारसेवकांना शासकीय सेवेत सामावून घेणे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्याकरीता पंचायत समितीसमोर बेमुदत आंदोलनाकरीता तालुक्यातील ग्रामरोजगारसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आहेत मागण्याग्रामरोजगारसेवकांना २ मे २०११ चा शासन निर्णय रद्द करून पूर्णवेळ करण्यात यावे. राजस्थान, छत्तीसगड राज्याप्रमाणे शासन सेवत समाविष्ट करण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकांचे मानधन ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा न करता ग्रामरोजगार सेवकांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात यावे. ग्रामरोजगार सेवकांना शासकीय विमा संरक्षण देण्यात यावे. ग्रामरोजगारसेवक यांचे जून २०१८ पासूनचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, आदी मागण्या आहेत.
देवळी तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:39 AM