लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारताचे रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांच्या सूचनेनुसार मध्यरेल्वेचे महाप्रबंधक आणि नागपूर व भुसावळ मंडळातील संसद सदस्यांची बैठक नागपुरात झाली. या बैठकीत खासदार रामदास तडस यांनी ४१ मुद्यांवर रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. रेल्वे प्रशासनाच्यावतीने एकत्रितपणे सर्व मुद्दयांचा कार्यपालन अहवाल सादर करण्यात येणार असल्याने रेल्वे विभागाशी संबंधित अमरावती व वर्धा जिल्ह्यातील विविध विषयांवर पाठपुरावा करण्याकरिता मोठी मदत होईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.रेल्वेच्या महाप्रबंधकांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध रेल्वेस्थानकावरील प्रलंबित थांबे, पायाभूत सुविधा, नवीन रेल्वेस्थानकाची निर्मिती, सर्व रेल्वेस्थानकावर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देणे, महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम रेल्वे स्थानकाचा प्रस्तावित विकास, नवीन रेल्वे गाड्या सुरू करणे यासह रेल्वे प्रवासी संघटनांकडून प्राप्त झालेल्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच रेल्वे प्रवासी व स्थानिक नागरिकांशी निगडित ४१ मुद्दे मांडण्यात आले. मंडळ रेल्वे प्रबंधकांनी बैठकीदरम्यान संपूर्ण रेल्वे मंडळातील माहितीचे सादरीकरण केले. यामध्ये २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या वित्तीय वर्षातील विविध रेल्वेस्थानकावर प्रस्तावित व प्रगतिपथावर असलेली कामे, स्वच्छताविषयक माहिती, रेल्वे सुरक्षेसंबंधित कामे, प्रवासी सुविधा तसेच नागपूर मंडळाशी संबंधित माहिती विस्तृतपणे मांडण्यात आली. या बैठकीला महाव्यवस्थापक, नागपूर व भुसावळचे मंडळ व्यवस्थापक, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वेचे परिचालन व्यवस्थापक, मध्य रेल्वेचे प्रधान वाणिज्य प्रबंधक, उपमहाप्रबंधक, मंडळ रेल्वे अभियंता तथा वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खासदारांनी ४१ मुुद्यांवर वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:17 AM
रेल्वे प्रशासनाच्यावतीने एकत्रितपणे सर्व मुद्दयांचा कार्यपालन अहवाल सादर करण्यात येणार असल्याने रेल्वे विभागाशी संबंधित अमरावती व वर्धा जिल्ह्यातील विविध विषयांवर पाठपुरावा करण्याकरिता मोठी मदत होईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देनागपुरात विशेष बैठक : संसद सदस्य व मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची चर्चा