वर्धा : हॉली डे रिसोर्टची संपूर्ण जागा ही महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट यांच्या मालकीची आहे. एमटीडीसीने ही जागा वर्धा हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ३० वर्षांकरिता भाडेतत्वावर दिली होती; परंतु गत २० वर्षांपासून कंपनीने एमटीडीसीला भाडे दिलेले नाही. त्यामुळे एमटीडीसीने २००२ मध्ये कंपनीची लीज रद्द केली. त्यानंतर सदर प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ट होते. जिल्हाधिकाऱ्यांनी एमटीडीसीच्या बाजूने निर्णय दिला. या आदेशाविरूद्ध वर्धा हॉटेल प्रा.लि. यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा यांच्या समक्ष अपिल दाखल केली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा यांनी वर्धा हॉटेल प्रा.लि. यांची अपिल ३१ मार्च २०१६ रोजी खारिज केली. त्यानंतर एमटीडीसीचे क्षेत्रीय अधिकारी हनुमंत हेडे यांनी वर्धा हॉटेल प्रायवेट लिमिटेडची मालमत्ता सील केली. परंतु शिवसागर शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये ३० दुकान आहेत. सदर दुकाने हे वर्धा हॉटेल प्रा.लि.ने सबलीज मधून दिलेले होते. सर्व दुकानदार नियमितपणे त्यांचे भाडे भरत असताना २ मे २०१६ रोजी एमटीडीसीचे क्षेत्रीय अधिकारी हनुमंत हेडे यांनी सर्व दुकानदारांना धमकी देत सात दिवसात सर्व दुकान खाली करण्याचे आदेश दिले.यामुळे ३० दुकाने व प्रत्येक दुकानदाराच्या परिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे सदर शिवसागर शॉपींग कॉम्प्लेक्समधील सर्र्व दुकानदारांनी एम.टी.डी.सी. जबरदस्तीने खाली करण्याचा प्रयत्नात असताना दुकाने वाचविण्याकरिता सर्वांनी उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर येथे धाव घेवून एम.टी.डी.सी व वर्धा हॉटेल प्रा.लि. यांच्या विरूद्ध याचिका दाखल केली. सर्र्व दुकानदारांतर्फे अॅड. समीर विश्वास सोहोनी, नागपूर यांनी युक्तीवाद केला. यावर १० मे २०१६ रोजी आदेश पारित झाला. सदर आदेशामध्ये सर्व दुकानदारांचा ताबा जैसे थे ठेवावा असे नमूद आहे. त्यामुळे सदर याचिकेसंदर्भात जोपर्यंत कोणताही पुढील आदेश पारित होत नाही, तोपर्यंत तरी दुकाने सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.(प्रतिनिधी)
२० वर्षांपासून एमटीडीसीला भाडे नाही
By admin | Published: May 13, 2016 2:14 AM