१ जुलै २०२३ रोजी झालेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातात २५ निष्पाप जीवांचा बळी गेला होता. या अपघाताला १६५ दिवसांचा कालावधी लोटल्यावरही शासनाने पीडितांच्या निवेदनाची दखल न घेतल्याने व दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने पीडित परिवारांनी ७ डिसेंबर २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले.
या दरम्यान राज्यपाल रमेश बैस, विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, राष्ट्रवादी नेते रोहित पवार, खासदार रामदास तडस, माजी आमदार अमर काळे, वाशिम जिल्हा आमदार लखन मलिक इत्यादी अनेक नेत्यांना पीडितांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालय जवळील साखळी उपोषणाला १२ दिवस लोटूनही अद्यापही लिखित स्वरूपात मागण्या मंजूर न झाल्याने पीडित परिवाराच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून "मूक मोर्चा" चे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चा पूर्णपणे निष्पक्षीय असून अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे.