दोन आरोपींना अटक : चोरांबा शिवारातील घटना; कासवाचा शोध भोवलाआकोली : चोरांबा शिवारात २५ एप्रिल रोजी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. ही हत्या गुप्तधनाच्या हव्यासातूनच करण्यात आल्याची माहिती मंगळवारी उघड झाली. या प्रकरणात खरांगणा (मो.) पोलिसांनी निवृत्ती भाऊराव खरगे (३६) रा. बोदड व सावलू तुकाराम तेलघाणे (४०) रा. गौरखेडा या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.याबाबत वृत्त असे की, भास्कर चिकराम (२६) रा. चोरांबा याचा २५ एप्रिल रोजी चोरांबा शिवारात मृतदेह आढळून आला होता. खरांगणा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. यानंतर प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालावरून भास्करची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची बाब पूढे आली. यावरून पोलिसांनी १३ मे रोजी अज्ञात इसमावर भादंविच्या कलम ३०२ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास करीत असताना भास्करचा निवृत्ती खरगे व सावलू तेलघाणे या दोघांसोबत वाद झाल्याची माहिती पूढे आली होती. पोलिसांनी त्या दिशेने तपासाची सुत्रे फिरवत चौकशी केली असता गुप्तधनाचा शोध घेत असताना वाद झाल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. निवृत्ती व सावलू या दोघांची भास्करसोबत ओळख होती. गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी कासव हवे होते. भास्करने माझ्या शेतातील विहिरीत कासव असल्याचे सांगितले. यावरून तिघे जण भास्करच्या शेतात गेले; पण तेथील विहिरीत कासव नसल्याचे दिसून आले. भास्करने अन्य शेतातील विहिरीत कासव मिळेल, असे निवृत्तीला सांगितले. दरम्यान, कासवाचा शोध घेत असतानाच झालेल्या वादात भास्करची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह काही अंतरावर बेवारस स्थितीत टाकून दोघांनी पळ काढला. या प्रकरणी खरांगणा पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला.(वार्ताहर)
गुप्तधनाच्या हव्यासातूनच ‘त्या’ युवकाची हत्या
By admin | Published: May 28, 2015 1:40 AM