जावेद पाशा : ‘मुस्लीम स्त्री : काल, आज व उद्या’ विषयावर व्याख्यान वर्धा : सर्वांसाठी शिक्षण, वैयक्तिक स्वच्छता व समुह एकात्मतेची भावना घेऊन सातव्या शतकात भारतात आलेल्या इस्लामचा स्वीकार येथील जाती व्यवस्थेने छळलेल्या शुद्र स्त्री-पुरुषांनी केला. पण त्यांचे इस्लामीकरण होऊनही पुर्वाश्रमीचे ब्राम्हणी पितृसत्ताक सांस्कृतिक अधिपत्य त्यांच्यात टिकून राहिल्यामुळे आज मुस्लीम देशातील स्त्री पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार वापरत असताना भारतीय मुस्लीम स्त्री मात्र अजूनही बंदीस्तच आहे, असे प्रतिपादन मराठी मुस्लीम साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व मुस्लीम आरक्षण आंदोलनाचे संयोजक प्रा. जावेद पाशा (नागपूर) यांनी केले. स्थानिक प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयातील डॉ. बाबासाहेब अांबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त ‘मुस्लीम स्त्री: काल, आज आणि उद्या’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते आपले विचार व्यक्त करत होते. अध्यक्षस्थानी जमात-ए-इस्लामी हिंदचे सय्यद नियाज अली तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. अब्दुल बारी उपस्थित होते. यावेळी सय्यद अली यांनी कुराणातून आलेली स्त्री विषयक समतेची तत्त्वे सांगितली. यावेळी प्राचार्य डॉ. रंभा सोनाये यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अमोल घुमडे व विद्यार्थिनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेखा बोबडे यांनी केले. संचालन डॉ. अनिता देशमुख यांनी केले तर आभार डॉ. मालिनी वडतकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. सुधाकर सोनोने, डॉ. प्रियराज महेशकर, डॉ. प्रतिभा ताकसांडे, प्रा. सोनाली सिरभाते, डॉ. धनंजय सोनटक्के, प्रा. मदनमोहन विश्वकर्मा, प्रा. प्रदीप दखणे, प्रा. दीपक महाजन, विजय चौधरी, विनोद बावणे, राजू मुंजेवार आदींनी सहकार्य केले.
भारतातील मुस्लीम स्त्री अजूनही बंदिस्तच
By admin | Published: January 05, 2017 12:42 AM