वर्धा : महिला बचत गटाला विश्वासात न घेता बँकेतून १ लाख ५ हजार रूपयाच्या रकमेची परस्पर उचल करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल करण्यात आली असून बँकेतील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. सदर प्रकरणी सखोल चौकशी करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.स्थानिक बँक आॅफ इंडियाच्या शाखेत तारफैल वॉर्ड नं. २४ मधील वीरता महिला बचत गटाचे खाते आहे. या खात्यामध्ये महिला बचत गटाचे शासनातर्फे देण्यात आलेले १ लाख ५ हजार रूपये जमा होते. २० मार्चला सदर रक्कम जमा करण्यात आली. परंतु महिला बचत गटाच्या सदस्यांना अंधारात ठेवून १ लाख ५ हजार या पूर्ण रकमेची परस्पर उचल करण्यात आली. विशेष म्हणजे ही रक्कम कुणी काढली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. बचत गटाचे खातेपुस्तक सचिवाजवळ होते, तरीही सचिव व अध्यक्षांची कोणतीही स्वाक्षरी नसताना बँकेने विड्रॉल दिला कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणामागे महिला बचत गट अधिकारी तसेच बँकेतील कर्मचारी, व अधिकाऱ्यांची हात मिळवणी असल्याचा आरोप वीरता महिला बचत गटाच्या सचिव अनिता रविकांत कन्नाके यांनी केला आहे. ही तक्रार घेऊन बचत गटाच्या महिला शहर पोलीस ठाण्यात गेल्या असता तेथे प्रकल्प अधिकारी निकिता ठाकरे यांनी तक्रार करण्याची गरज नाही, तुमचे पैसे लवकरच मिळतील असे सांगितले. पण खात्यात रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळात गटाच्या सचिव अनिता कन्नाके, बेबी कुबडे, नीता कुमरे, हमिदा शेख नशीर, शबिना नशीर अली, बानू शेख शाहिद, शहनाज शेख सलीम, मालता गजानन कन्नाके, स्वाती दुर्गे, राणी यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
बचत गटाच्या रकमेची बँकेतून परस्पर उचल
By admin | Published: June 28, 2014 11:44 PM