वडिलांचा टाहो : मारेकऱ्यांवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना साकडेआष्टी (श.) : तारासावंगा येथील ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या शेतात रामचंद्र कावळे (५०) यांचा २४ आॅगस्ट रोजी मृतदेह आढळून आला. हा अपघात नव्हे तर त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत सखोल चौकशी करून मारेकऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मृतकाचे वडील महादेव कावळे यांनी केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना निवेदन देण्यात आले.निवेदनानुसार रामचंद्रचा शोध घेत असताना कड नदी व नागझरी नाल्याच्या काठावर त्याची बनियान, दुपट्टा व चप्पल आढळून आली. यामुळे ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या शेतात मुलगा असावा, असा संशय आला. यामुळे महादेव व सहकारी पांदण रस्त्याने त्यांच्या शेतात गेले. दरम्यान, शिवहरी ठोंबरे, मुकींदा ठोंबरे, इंद्रजीत ठोंबरे, चेतन ठोंबरे, ओंकार ठोंबरे (गुड्डू) व बेलगाव येथील ट्रॅक्टर चालक येत होते. यातील शिवहरी याने, तुम्ही येथे कशाला आले, तुमचे येथे कोणते काम आहे, चला निघा आमच्या शेतातून, पिकाची नासधुस होईल, असे म्हणत धमकावले. यामुळे संशय आणखी बळावला. रामचंद्र तेथेच कुठेतरी असावा म्हणून शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह ठोंबरे यांच्याच शेतात नदीच्या काठावर आढळून आला. शिवहरी व सहकाऱ्यांनी शेतात लावलेली विद्युत तार व अन्य पुरावे नष्ट केले. यामुळे हा घातपातच असल्याचा आरोप महादेव कावळे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही मृतक रामचंद्रच्या वडिलांनी निवेदनातून दिला आहे.(प्रतिनिधी)
माझ्या मुलाचा मृत्यू विद्युत धक्क्याने नव्हे तर घातपातच!
By admin | Published: September 20, 2015 2:41 AM