पालकांत घबराट : शोधूनही मिळाली नसल्याने रेल्वे पोलिसांत केली तक्रारवर्धा : सोयाबीन कापणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यात गेलेल्या कुटुंबातील कोकीळा नामक मुलगी सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून रहस्यमयरित्या बेपत्ता झाली. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीय चांगलेच धास्तावले आहेत. सर्वत्र शोध घेऊनही मुलगी न मिळाल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार केली. सदर मुलीचे अपहरण तर झाले नसावे वा काही अनुचित प्रकार तर घडला नाही ना, अशी शंका या प्रकारातून व्यक्त केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव येथील बाळकृष्ण उर्फ बाळू सहारे हे कुटुंबीय गावातील काही लोकांसह सोयाबीन कापणीसाठी चांदुर रेल्वे जि. अमरावती येथील गोवर्धन कळमकर यांच्या शेतात दिवाळीपूर्वी गेले होते. काम आटोपल्यानंतर ते सोमवारी चांदुर रेल्वे येथून विदर्भ एक्सप्रेसने वर्धा येथे आले. वर्धा रेल्वे स्थानकावरून बल्लारशाह येथे जाण्याकरिता रेल्वेगाडी नसल्याने ते सेवाग्राम रेल्वे स्थानकावर गेले. बाळकृष्ण यांची पत्नी व सोबत असलेले सहकारी तिकीट काढण्याकरिता गेले. दरम्यान, त्यांची मुलगी कोकीळा ही काही कामासाठी थोडी दूर गेली आणि परत आली नाही. बराच वेळ ती परतली नसल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला; पण ती आढळून आली नाही. या प्रकारामुळे सहारे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत बाळकृष्ण यांनी सेवाग्राम रेल्वे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून नोंद घेण्यात आली आहे. यामुळे या मुलीचे अपहरण तर करण्यात आले नाही ना, किंवा तिच्यासोबत काही अनुचित प्रकार तर घडला नसावा ना, अशी शंका त्यांच्याकडून उपस्थित केली जात आहे. रेल्वे पोलिसांनी मुलीचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. चारही दिशांना जाण्याकरिता रेल्वेची सुविधा असलेल्या या रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेमुळे येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून रहस्यमयरीत्या मुलगी बेपत्ता
By admin | Published: November 09, 2016 12:52 AM