चैतन्य जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाला १२ दिवस उलटले असून, अनेक रहस्यमय खुलासे पुढे आले असताना शनिवारी दुपारच्या सुमारास आर्वी पोलिसांनी पुन्हा कदम रुग्णालयाची पाहणी करून कुलूपबंद खोली उघडली असता पोलिसांना ‘त्या’ बंद खोलीत ‘कुबेराचा खजिना’च मिळून आल्याने पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आहेत.
रात्री उशिरापर्यंत पैसे मोजण्याच्या मशीनने रक्कम मोजण्यात आली असता रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल ९७ लाख ४२ हजार रुपयांची रक्कम पोलिसांकडून मोजण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, मोजदाद रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. डॉ. शैलेजा कदम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी डॉ. कुमारसिंग कदम हे शैलजा कदम यांच्यासोबत नागपूर येथे रुग्णालयात असल्याने ज्या खोलीला कुलूप होते त्याची चावी कुमारसिंग कदमकडे होती.