तफावती दरामुळे वाढला कल : २९७३ शेतकऱ्यांची नोंद आर्वी : तालुक्यात यंदा तूरीचे उत्पादन समाधानकारक झाल्याने सध्या तूर पिकाची आवक वाढली आहे. खाजगी व्यापाऱ्यांकडून दिल्या जात असलेल्या दरात प्रती क्विंटल १ हजार ते १ हजार २०० रुपयांची तफावत येत असल्याने तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी नाफेडला तूर विकत आहेत. यंदा ११ जानेवारी ते १० मार्च पर्यंतच्या कालावधीत नाफेडकडे २१ हजार १९ क्विंटल तुरीची आवक झाली आहे. नाफेडकडून तूर या पिकाला प्रती क्विंटल ५ हजार ५० रुपये दर दिल्या जात आहे. गत दोन महिन्यात आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत २१ हजार १९ क्विंटल ५९ किलो तुरीची आवक झाली आहे. नव्याने तूर विकण्यासाठी आर्वी कृ.उ.बा.त तालुक्यातील २ हजार ९७३ शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंद केली आहे. तालुक्यात यंदा तुरीचे समाधानकारक उत्पन्न झाले. त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून केवळ ३ हजार ८०० ते ३ हजार ९०० इतका अल्पच प्रती क्विंटल दर दिला. नाफेडच्या तूलनेत प्रती क्विंटल १००० ते १२०० रूपयांची तफावत येत होती. योग्य भाव मिळत असल्याने तूर उत्पादकांनी खाजगी व्यापाऱ्यांकडे पाठ फिरवित नाफेडला तूर देण्यास पसंती दर्शविली. शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारा दर असल्याने यंदा आर्वी कृ.उ.बा.त तुरीची विक्रमी आवक झाली. गैरसोय होऊ नये म्हणून आर्वी कृ.उ.बा.ने शेतकऱ्यांच्या मालाच्या पोत्यांची नोंद करावयास सुरुवात केली. यात २ हजार ९७३ शेतकऱ्यांनी नाफेडला तूर विकल्याची नोंद घेण्यात आली आहे. २० फेब्रुवारीपर्यंत नाफेडला ज्या शेतकऱ्यांनी तूर विकली त्यांना धनादेशाद्वारे चुकारा देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील एकाच दिवशी १० हजार क्विंटल तुरीची आवक झाली. ज्या शेतकऱ्यांनी होळीनंतर शेतमाल विक्रीकरिता आणण्यासाठी आर्वी कृ. उ. बा. त नोंद केली आहे अशा शेतकऱ्यांना माल आणण्यासंबंधीच्या सूचना भ्रमणध्वनीद्वारे देण्यात येणार आहेत. मागील दोन वर्ष तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला. एका वर्षी अतिवृष्टीने तर दुसऱ्या वर्षी कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले होते. यंदा वेळोवेळी पाऊस आल्याने तसेच वातावरणही तुरीसाठी पोषक राहिल्याने तुरीचे उत्पादनही बऱ्यापैकी झाले आहे. गत वर्षीच्या तूलनेत यंदा व्यापाऱ्यांकडून अतीशय अल्प दर दिल्या जात आहे. खासगी व्यापारी व नाफेडकडून दिल्या जात असलेल्या दरात नाफेडचा दर अधीक असल्याने तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी नाफेडला तूर विकत असल्याचे चित्र आहे. तूर उत्पादकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या तुरीची जोपर्यंत आवक सुरू राहील तोपर्यंत नाफेड खरेदी सुरू ठेवेल असे सांगण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)
नाफेडकडे २१ हजार १९ क्विंटल तुरीची आवक
By admin | Published: March 13, 2017 12:48 AM