संस्थेने टाकला स्वखर्चाने मुरूम : पूल वाहून गेल्याने रहदारी धोक्यात सेवाग्राम : रोडवरील खड्डे आणि ढोले वाहून गेल्याने सेवाग्राम ते मांडगाव मार्गावरील रहदारी संकटात आली आहे. दूध उत्पादकांची वाहने उलटत असल्याने नागापूर दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेने विटांची चुरी टाकला. शिवाय काटेरी झाडे तोडून तात्पूरती व्यवस्था केली; पण पुढे कसे, या प्रश्नाने नागापूरच्या ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली आहे. नागापूर गाव गोपालन आणि दुधासाठी प्रसिद्ध आहे. येथून दररोज दोन वेळा ३ हजार ते ३ हजार २०० लिटर दूध वर्धेच्या गोरस भंडाराला पुरविले जाते. नागरिकांचे सर्व व्यवहार सेवाग्राम आणि वर्धा येथे होतात. शिवाय विद्यार्थी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आवागमन होते; पण नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नागापूर ते करंजी (भोगे) दरम्यान नाल्यावरील ढोले वाहून गेलेत. येथूनच गेलेल्या बायपास मार्गावर खड्डे पडल्याने चालकांना वाहन चालविणे कठीण झाले. खड्डे चुकविताना दुचाकी घसरून पडत होत्या. पहाटे व दुपारी जाणाऱ्या गोरस भंडारच्या दूध वाहनाचा प्रवासही धोक्याचा झाला आहे. लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने दूध उत्पादक सहकारी संस्थेने पुढाकार घेत रोडवरील खड्ड्यात विटांची चुरी टाकली. रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या फांद्या तोडून मार्ग मोकळा केला. करंजी नजीकचा पूल अद्याप नादुरूस्त असल्याने मार्ग बंद आहे. नागापूरचे ग्रामस्थ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त आहे. दैनंदिन व्यवहारात अडचणी येत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत रस्ते, पूल दुरूस्त करावे, अशी मागणी दूध संस्थेचे अध्यक्ष नारायण खेडे, सचिव शिवराम वडतकर, ग्रा.पं. सदस्य विठ्ठल कारामोरे यांनी केली आहे.(वार्ताहर)
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागापूरचे गोपालक संकटात
By admin | Published: July 17, 2016 12:33 AM