वर्धा : जिल्ह्यात सेलू, आष्टी, समुद्रपूर, कारंजा घाडगे या चार नगरपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. त्यात कारंजा, आष्टी येथे काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर, सेलू नगरपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपला घवघवीत यश मिळाले आहे.
१७ सदस्यीय सेलू नगरपंचायत निवडणुकीत सेलू सुधार आघाडीच्या नावावर शैलेंद्र दप्तरी, काँग्रेस नेते शेखर शेंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल देवतळे यांनी उमेदवार उभे केले होते. त्यांच्या आघाडीला सहा जागांवर यश मिळाले आहे.
सेलू नगरपंचायतीत भाजपचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात आली. यात पक्षाला पहिल्यांदाच सहा जागांवर यश मिळालं. काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांचे निकटवर्तीय सेलू तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय जयस्वाल यांनी काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.