वेबसाईटवर टाकले अश्लील छायाचित्र वर्धा : येथील एका इसमाचे फेसबुक व इमेल हॅक करून त्यावर अश्लील चित्र टाकून बदनामी करणाऱ्या नागपूर येथील एका हॅकरला अटक करण्यात आली आहे. योगेश रमेश गोडे (३२) रा. प्लॉट क्रमांक २७ टिळक वॉर्ड, रामटेक, जि. नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस सुत्रानुसार, सुदामपूरी येथील रवींद्र पुरूषोत्तम बेले (३२) यांनी सेवाग्राम पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार कुणीतरी अज्ञात इसमाने त्याचे फेसबुक व इमेल अकाऊंटचे पासवर्ड बदलवून व फेसबुकचा ई-मेल आयडी बदलवून त्यावर अश्लील छायाचित्र टाकून सामाजिक प्रतिष्ठेला इजा पोहचविली व त्याची सामाजिक बदनामी केल्याचे सांगितले. यावरून लेखी रिपोर्ट वरून सेवाग्राम पोलिसांनी कलम ६७ (अ) माहिती तंत्रज्ञान कायदा (सुधारित) सन २००८ अन्वये गुन्हा नोंद केला. सदर तपास पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास सायबर सेलतर्फे करण्यात आला. तपासादरम्यान या अज्ञात आरोपीने वापरलेल्या सर्व तांत्रिक सेवा पुरविणाऱ्या वेबसाईट्स, इंटरनेटवरील अनेक सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून गुन्ह्याचा गत दीड वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू असताना या गुन्ह्यात रामटेक येथील युको बँकेच्या इमेल अकाऊंटची माहिती मिळाली. सदर बँक खात्याटबाबत इत्यंभूत माहिती एकत्र करण्यात आली. त्या खात्याचा वापरकर्ता योगेश गोडे हाच या प्रकरणाचा मास्टर मार्इंड असल्याचे समोर आले. यावरून वर्धेतील पोलीस पथकाने रामटेक येथे जावून सदर योगेश याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता सदरचा गुन्हा केल्याचे मान्य केले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, हवालदार गिरीश कोरडे, नरेंद्र डहाके, कुलदीप टांकसाळे, चंद्रकांत जिवतोडे व चालक विलास लोहकरे यांनी केली. (प्रतिनिधी)
फेसबुक व मेल हॅकिंग प्रकरणी नागपूरच्या हॅकरला अटक
By admin | Published: September 24, 2016 2:14 AM