विजय चौधरी
कारंजा (घाडगे) (वर्धा) : कारंजा तालुक्यातील नारा येथील स्व. यादवराव केचे आश्रम शाळेत बारा वर्षीय मुलगा शिवम सनोज उईके याचा ३० रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री ८:३० च्या सुमारास शाळेतील खोलीत असलेल्या गादीखाली संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. हा घातपात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला होता. अखेर कारंजा पोलिसांनी याप्रकरणाचा सतत तीन दिवस तपास करून शिवमचा मारेकरी त्याच्याच गावातील रहिवासी १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पहिले त्याने मी गुन्हा केला नसल्याचे सांगितले पण, पोलिसांनी खाक्या दाखवताच हत्येची कबुली देत सर्व घटनाक्रम पोलिसांसमोर कथन केला.
नारा येथील स्व. यादवराव केचे आदिवासी आश्रमशाळेत अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमा गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांपैकी मृतक शिवमचा खोलीतील गाद्यांखाली संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्या ठिकाणी जमिनीवर रक्ताचे डागही उमटले होते. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीती निर्माण झाली होती. परिणामी, पालकांनी आपापल्या पाल्यांना मूळगावी नेले होते. मात्र, कारंजा पोलिसांकडून तपास सुरूच होता. विविध सामाजिक संघटनांकडूनही जाब विचारला जात होता. शाळेत मोजकेच विद्यार्थी उपस्थित असल्याने शाळा परिसरात शुकशुकाट होता. कारंजा पोलिसांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्याना विश्वासात घेत चौकशी केली.
मृतक शिवम व त्याच्याच गावातील १५ वर्षीय विद्यार्थ्याचा वाद असल्याचे पुढे आले. स्वगावी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिवमचा मारेकरीही होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या बयाणानुसार, पोलिसांनी आरोपी मुलाच्या वडिलांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत विद्यार्थ्याला शाळेत बोलावून घेतले. आरोपी विद्यार्थ्याची चौकशी करून त्याला विचारणा केली असता त्याने पहिले मी हा गुन्हा केलेला नाही, असे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांना दाट संशय असल्याने पोलिसांनी आपला रुबाब दाखवताच आरोपी विद्यार्थ्याने शिवमच्या हत्येची कबुली दिली.
असा घडला घटनाक्रम...
शिवमचा मारेकरी अल्पवयीन विद्यार्थी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचाच होता. कधी मोबाइल चोरणे किंवा लपवून ठेवणे इतर विद्यार्थ्यांना चिडवणे आदी प्रकार तो करायचा. घटनेच्या दिवशी आरोपी विद्यार्थ्याने सकाळी मोबाइल चोरला होता, याची माहिती शिवमला पडली. तो शिक्षकांना ही बाब सांगणार तर नाही ना, अशी भीती आरोपी विद्यार्थ्याला होती. याच कारणातून आरोपी विद्यार्थ्याने शिवमसोबत पेटीतून कपडे काढण्यावरून वाद झाला. शिवमला पेटीची चावी मागितली, चावी न दिल्याने आरोपी विद्यार्थ्याने रागाच्या भरात शिवमला मारहाण करून फरशीवर पाडले. यात शिवमच्या डोक्याला मार लागून रक्त निघून तो बेशुद्ध पडला. ही बाब शिक्षकांना माहिती होऊ नये, म्हणून आरोपीने शिवमच्या अंगावर गाद्या टाकल्या. अखेर शिवमचा श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला.
आरोपी विद्यार्थी बाल निरीक्षणगृहात
पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून शिवमच्या मारेकऱ्यास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. त्याला ३ रोजी वर्धा येथील बाल न्यायालयापुढे हजर केले. त्याची रवानगी बाल निरीक्षण गृहात करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील गाडे यांनी दिली.