वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानात पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातले भाजपा आणि मित्रपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.
काँग्रेसने देशातील करोडो लोकांवर 'हिंदू दहशतवाद' म्हणून ठपका ठेवला. गेल्या हजारो वर्षांत हिंदूच्या दहशतवादीसंबंधी कोणती घटना घडली आहे का? इंग्रज इतिहासकारांनी सुद्धा असे केले नाही. आपल्या 5000 वर्षे जुन्या सभ्यतेला कलंक कोणी लावला? अशा काँग्रेसला आपण माफ करणार का? असे सवाल करत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच, काँग्रसचे नते सुशील कुमार शिंदे यांनी 'हिंदू दहशतवाद' शब्द आणला असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. काही दिवसांपूर्वीच कोर्टाचा निकाल आला आणि या निकालामुळे काँग्रेसच्या कटाचे सत्य देशासमोर आले. काँग्रेसकडून स्वच्छचा दूताचा अपमान करण्यात आला. काँग्रेसने दिलेली शिवी माझ्यासाठी दागिना आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
याचबरोबर, स्वामी असीमानंद यांची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावरून काँग्रेसचे षडयंत्र उघड झाले आहे. त्यामुळे देशातील जनतेने काँग्रेसला धडा शिकविण्याचा निर्णय घेतल्याचंही काँग्रेस जाणून आहे. म्हणूनच दोन्ही काँग्रेसचे नेते मैदान सोडून पळत आहेत. ज्यांनी हिंदू दहशतवादाचा प्रचार केलाय, ते लोक घाबरले आहेत. त्यामुळे याठिकाणी हिंदूंची लोकसंख्या कमी आहे, अशा मतदारसंघातून हे लोक निवडणूक लढवत आहेत, असा टोला नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता लगावला.
याशिवाय, नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर निशाना साधत शरद पवार कुटुंबात अंतर्गत कलह असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'स्वतःच्या पुतण्याकडूनच शरद पवारांची दांडी गुल्ल झाली. शरद पवारांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवत आहेत.' तसेच, अजित पवारांच्या वादग्रस्त विधानाची आठवण नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला. ते म्हणाले की, 'विसरु नका, जेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी अजित पवार यांना धरणातील पाण्यासंदर्भात प्रश्न विचारायला गेले असता, त्यांना काय उत्तर दिले? त्यांना असे उत्तर दिले की, जे मी बोलूही शकत नाही.'
ज्यावेळी मावळचे शेतकरी आपल्या अधिकारांसाठी लढत होते, त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा आदेश देण्यात आला. शरद पवार स्वत: शेतकरी असूनही शेतकऱ्यांना विसरले, त्यांच्या कार्यकाळात कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण शरद पवार यांनी कोणचीच पर्वा केली नाही, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.